केएलई निमंत्रितांची फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : केएलई तांत्रिक महाविद्यालय आयोजित केएलई चषक निमंत्रितांच्या आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून गोगटे महाविद्यालयाने जैनचा, केएलईने गोगटे पियुचा, लिंगराजने अंगडीचा, डीवायएसने एसजीबीआयटीचा पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. केएलई तांत्रिक महाविद्यालयाच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात लिंगराज संघाने संजय घोडावत संघाचा टायब्रेकरमध्ये 4-3 असा पराभव केला. पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केएलई इंजिनिअरींग संघाने गोगटे पियु संघाचा 2-1 असा पराभव केला.
केएलईतर्फे कुनालने दोन गोल केले. तर गोगटेतर्फे अथर्व बी.ने गोल केला. दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात गोगटे कॉलेजने जैन इंजिनिअरींगचा 2-0 असा पराभव केला. गोगटेतर्फे आपटेकर व चेतन यांनी गोल केले. तिसऱ्या सामन्यात डीवायईएस संघाचा एसजीबीआयटी अ संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. भरत गावडाने एकमेव गोल केला. चौथ्या सामन्यात लिंगराज संघाने अंगडी संघाचा टायब्रेकरमध्ये 4-3 असा पराभव केला. या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा अवलंब केला. त्यामध्ये लिंगराजने 4-3 अशा गोलफरकाने पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. शनिवारी सकाळी उपांत्य फेरीचे सामने खेळविले जाणार असून दुपारी अंतिम फेरीचा सामना होणार आहे.









