जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी एलअॅन्डटीकडून खोदाई
बेळगाव : गोगटे सर्कल येथे खोदण्यात आलेल्या खड्ड्याकडे कित्येक दिवसांपासून दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांच्या अडचणी वाढल्या आहेत. भर चौकातच एलअॅन्डटीकडून चोवीस तास पाण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. मात्र, दुरुस्तीचे काम संथगतीने होत असल्याने खोदलेला खड्डा जैसे थेच आहे. त्यामुळे ये-जा करणे गैरसोयीचे होऊ लागले आहे. एलअॅन्डटी कंपनीकडून चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जलवाहिनींची गळती आणि इतर कामांसाठी विविध ठिकाणी खोदाई केली जात आहे. त्यामुळे रस्त्यांची वाट लागत आहे. शिवाय सार्वजनिक वाहतुकीवरही याचा परिणाम होऊ लागला आहे. गोगटे सर्कलमध्ये रस्त्यात खोदाई केल्याने वाहतुकीला अडथळा ठरू लागला आहे. तातडीने दुरुस्ती करून रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.









