अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम : एलेना ओस्टापेन्को, सिर्स्टिया, फ्रान्सेस टायफो, टेलर फ्रिट्झ यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेच्या कोको गॉफने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, बेन शेल्टन, कॅरोलिना मुचोव्हा यांनीही एकेरीत शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांनीही उपांत्य फेरी गाठली आहे.
कोको गॉफला याआधी ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठण्याचा अनुभव आहे. मात्र जेतेपदाची शर्यत तिला जिंकता आलेली नाही. यावेळी ती कसर भरून काढण्याचा तिचा प्रयत्न असेल. तिने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत एलेना ओस्टापेन्कोचा 6-0, 6-2 असा धुव्वा उडविला. 2001 सेरेना विल्यम्सनंतर या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी ती अमेरिकेची पहिली टेनिसपटू आहे. गेल्या 17 सामन्यात गॉफने मिळविलेला हा 16 वा विजय होता. गॉफला मात्र विम्बल्डन स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत झाली होती. पण फ्रेंच ग्रँडस्लॅममध्ये तिने अंतिम फेरी गाठली होती. पण स्वायटेककडून तिला हार पत्करावी लागल्याने उपविजेतेपद मिळाले होते. तिची उपांत्य लढत दहाव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हाशी होईल. गेल्या जूनमध्ये झालेल्या प्रेंच ओपन ग्र्रँडस्लॅम स्पर्धेत मुचोव्हाने अंतिम फेरी गाठली होती. उपांत्यपूर्व फेरीत तिने रोमानियाच्या 30 व्या मानांकित सोराना सिर्स्टियावर 6-0, 6-3 अशी एकतर्फी मात केली. मागील वर्षी यावेळी मुचोव्हा जागतिक क्रमवारीत 235 व्या स्थानावर होती आणि येथील स्पर्धेत ती पहिल्याच फेरीत पराभूत झाली होती. सिर्स्टिया मात्र 2009 नंतर प्रथमच ग्रँडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळत होती.

अर्धआच्छादित छताखाली आर्थर अॅश स्टेडियमवर झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातत 23 वेळा ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱ्या नोव्हॅक जोकोविचने अमेरिकेच्या नवव्या मानांकित टेलर फ्रिट्झचा 6-1, 6-4, 6-4 असा करून उपांत्य फेरी गाठली. ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची त्याची ही विक्रमी 47 वी वेळ आहे. गेल्या महिन्यात त्याने सिनसिनॅटी मास्टर्स 1000 स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. त्याचे ते 1000 मास्टर्स स्पर्धेचे विक्रमी 39 वे जेतेपद होते. त्याने येथील स्पर्धा 2011, 2015, 2018 अशी तीनवेळा जिंकली आहे. त्याची उपांत्य लढत बिगरमानांकित बेन शेल्डनशी होईल. 2005 नंतर प्रथमच यावेळी शेवटच्या आठ फेरीत अमेरिकेच्या तीन खेळाडूंनी स्थान मिळविले होते.
अमेरिकेच्या बिगर मानांकित 20 वर्षीय शेल्टनने आपल्याच देशाच्या दहाव्या मानांकित फ्रान्सेस टायफोला 6-2, 3-6, 7-6 (9-7), 6-2 असा पराभव करीत शेवटच चारमध्ये प्रथमच स्थान मिळविले. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा शेल्टन हा गेल्या 30 वर्षांतील सर्वात युवा खेळाडू बनला आहे.
बोपण्णा व एब्डन दुहेरीच्या उपांत्य फेरीत

भारताचा रोहन बोपण्णा व ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डन यांनी यूएस ओपनची सलग उपांत्य फेरी गाठली आहे. पहिल्या सेटमध्ये संघर्ष करावा लागला तरी या सहाव्या मानांकित जोडीने अमेरिकेच्या नाथनियल लॅमन्स व जॅक्सन विथ्रो यांच्यावर 7-6 (12-10), 6-1 असा पराभव केला. यावर्षीच्या सलग दुसऱ्या ग्रँडस्लॅमध्ये त्यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. याआधी त्यांनी विम्बल्डन स्पर्धेतही उपांत्य फेरी गाठली होती. ग्रँडस्लॅममध्ये पुरुष दुहेरीची कारकिर्दीत दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याची बोपण्णाला यावेळी मिळाली आहे. यापूर्वी 2010 मध्ये त्याने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत त्यांची लढत फ्रान्सच्या पियरी ह्युजेस हर्बर्ट व निकोलास मेहुत यांच्याशी होणार आहे.









