गडहिंग्लज कारखान्याच्या विजयी संचालकांचा जाहीर सत्कार
गडहिंग्लज प्रतिनिधी
आमदार हसन मुश्रीफ, डॉ. प्रकाश शहापूरकर आणि त्यांचे सहकारी गडहिंग्लज साखर कारखाना चालवतील यावर सभासदांनी विश्वास व्यक्त केला आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत गडहिंग्लज कारखाना केवळ अर्थपुरवठय़ा अभावी बंद पडला अशी वेळ कारखान्यावर येवू देणार नाही असे जाहीर आश्वासन आमदार हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लजच्या लक्ष्मी चौकात आयोजीत नवनिर्वाचीत संचालकांच्या सत्कार सभेत दिले आहे.
गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणूकीत आमदार मुश्रीफ, डॉ. शहापूरकर यांच्या नेतृत्वाखाली शाहू आघाडीने संपूर्ण 19 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली आहे. या नवनिर्वाचीत संचालकांचा सत्कार गुरूवारी रात्री लक्ष्मी चौकात पार पडला. सुरूवातीस सिध्दार्थ बन्ने यांनी स्वागत केले. त्यानंतर आमदार मुश्रीफ, डॉ. शहापूरकर, प्रकाश चव्हाण यांच्यासह सर्व नुतन संचालक, पॅनेलसाठी मदत करणाऱया नेत्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले, डॉ. शहापूरकर आणि प्रकाश चव्हाण यांच्याकडे कारखान्याची सुत्रे दिली असून त्यांच्याकडून पारदर्शी कारभार चालणार आहे. मोठय़ा विजयामुळे सर्वांची जबाबदारी वाढली असून ती पुर्ण करण्याची गरज आहे. ब्रिस्क कंपनीला तत्कालीन चेअरमन, व्हा. चेअरमन यांनी का बाहेर काढले ? हे आजअखेर आपल्याला समजले नसल्याचे सांगत आज असे वागणाऱयांना सभासदांनी कोठे ठेवले ? असा टोमणा लगावत मुश्रीफ पूढे म्हणाले, जनतेच्या प्रेमावर आणि कार्यकर्त्यांच्या बळावर शाहू आघाडी लढली असून त्याला घवघवीत यश मिळाले आहे. गडहिंग्लज कारखान्याचे विस्तारीकरण, इथेनॉल, को-जनरेशन करत स्थिरावण्यासाठी जिल्हा बॅक मदतीसाठी तयार असल्याचे सांगत साऱया संचालकांनी कारखाना सुरू करण्यासाठी आजपासून काम लागावे असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
यावेळी डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी गडहिंग्लज कारखाना चांगला चालविल्यामुळे आपल्याला यापुर्वी या सत्तेतून बाजूला केले. त्यांच्यावर नितीने आता सुड उगवल्याची टिका केली. खुल्या मनाने आमदार मुश्रीफ यांची साथ मिळाली. एकहाती सत्ता मिळाल्याने सर्जरी बंद करत कारखान्याच्या हिताच्या निर्णयासाठी काम करणार असल्याचे सांगत कारखान्यासाठी 125 कोटीची गरज आहे. ती मिळाल्यास तीन वर्षात कारखाना नफ्यात येण्यास अडचण नाही असे सांगत कारखान्याला उर्जितावस्थेत आणण्यासाठी सर्वांनी ताकद द्यावी असे आवाहन केले.
माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी व्हा. चेअरमन प्रकाश चव्हाण, स्वाभिमानीचे राजेंद्र गड्डय़ान्नावर, जि. प. माजी उपाध्यक्ष सतिश पाटील, रमेश रिंगणे, संग्रामसिंह कुपेकर, ऍड. हेमंत कोलेकर, मनसेचे नागेश चौगुले आदीची भाषणे झाली. सुत्रसंचालन प्रा. आशपाक मकानदार तर आभार रामगोंड पाटील यांनी मानले. व्यासपीठावर प्रा. किसनराव कुराडे, सोमगोंडा आरबोळे, उदयराव जोशी, विष्णूपंत केसरकर, गणतराव डोंगरे, संतोष चिक्कोडे, मनिषा तेली, बसवराज आजरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
गडहिंग्लज कारखान्याच्या निकालानंतर शहरातील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हा सत्काराचा कार्यक्रम आयोजीत करत आहोत. गडहिंग्लज शहरातही शाहू आघाडीने 190 मताची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर हे कार्यकर्त्यांनी मिळवलेले दैदिप्यमान यश असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी बोलताना सांगितले.









