रत्नागिरी :
कोकणतला सर्वात मोठा सण म्हणजे ‘शिमगा’. परंपरा, उत्साह आणि मानपान यांचा संगम असलेल्या याच शिमगोत्सवाला मंगळवारी फाकपंचमीपासून सुरुवात झाली. होळीभोवती होम पेटवून शिमगोत्सवात गावकऱ्यांच्या उत्साहाला रंग चढू लागला आहे. गावोगावच्या देवदेवतांना रुपं लावण्याची ग्रामस्थांची लगबग सुरू झालीय. एरव्ही कायम देवाच्या भेटीला, दर्शनाला मंदिरात जाणाऱ्या भक्तांच्या भेटीला आता देव पालखीत बसून निघणार आहेत. रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे येथील ग्रामदैवत श्री कालिका देवीला रुपे लावण्याचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.
गावागावात तब्बल महिनाभर साजरा होणारा हा ‘शिमगोत्सव’ म्हणजेच गावातील जत्रोत्सवाची, सांस्कृतिक वैभवाची पर्वणी मानली जाते. कोकणात गावोगावी शिमगोत्सवाची सांस्कृतिक परंपरा अगदी पिढ्यान्पिढ्या अविरत चालू आहे. या पारंपरिक होलिकोत्सवाचा आनंद गावागावात दिसू लागला आहे. शिमगोत्सवाची रंगत अगदी पौर्णिमेपर्यंत धुलिवंदनापर्यंत सुरू राहते. पण त्यापूर्वी ग्रामदेवतांच्या पालख्या सजवण्यासाठी देवांना ऊपे लावण्यासाठी ग्रामस्थांची लगबग सुरू झाली आहे. शहरानजीकच्या मिरजोळे येथील ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवी मंदिरात पालखी सजवून देवतांना ऊपे लावण्यांचा कार्यक्रम गावप्रमुख (मानकरी) शरद पाटील, प्रमुख गावकर दत्ताराम गावकर, तसेच खोत, गुरव, इतर मानकरी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. पालखी सजवल्यानंतर गाव समृद्धी, ग्रामस्थांचा एकोपा नांदण्यासाठी गाऱ्हाणे घालून येथील देवींच्या सहाणेवर पालखीला आसनस्थ करण्यात आले आहे. देवींची पालखी रत्नागिरी शहरात मानाच्या ठिकाणी भक्तगणांच्या दर्शन भेटीला वाजतगाजत पालखी मिरवणुकीने नेण्यात येणार आहे. शहर दर्शन भेटीनंतर गावातील मुख्य शिमगोत्सवाच्या कार्यक्रमाला म्हणजेच धुलिवंदनाच्या आदल्या दिवशी पुन्हा गाव सहाणेवर दाखल होणार आहे.

- आनंदमयी शिमगोत्सवाला खऱ्या अर्थाने प्रारंभ
शिमगोत्सवात होळी तोडण्यापासून ते देवाला ऊप लावण्यापर्यंत सर्व मान हे पिढ्यान्पिढ्यानुसार ठरलेले आहेत. त्यानुसार शिमगोत्सवासाठी ग्रामदेवतांना ऊपे लावण्यात येऊन पालख्या सजवण्यात येत आहेत. तेरसे (पौर्णिमे अगोदरचे) शिमगा व भद्रेच्या मुहुर्तावर पौर्णिमेचा शिमगा उत्सव साजरे होणार आहेत. कोकणातील प्रत्येक गावात अशा या आनंदमयी शिमगोत्सवाला खऱ्या अर्थाने सुऊवात झाली असून गावांमध्ये भक्तीमय वातावरण आहे. धुळवडीपर्यंत सारे ग्रामस्थ सारी संकटे दूर करून सर्वांच्या सुख–समृद्धीसाठी साकडे घालत ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होणार आहेत, असे मिरजोळे गावप्रमुख शरद पाटील यांनी सांगितले.








