अखेर काँग्रेसवर खूप दिवसांपासून नाराज असलेले मुंबई काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार मिलिंद मुरली देवरा यांनी पक्षाचा त्याग करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा दैवदुर्विलास म्हणावा की काळाचा महिमा, की ज्या देवरा परिवाराने दीर्घकाळ शिवसेनेचा दुस्वास केला आणि त्यांच्या विरोधातील शक्ती म्हणून काँग्रेसमध्ये मानाचे स्थान कायम ठेवले, त्या परिवाराच्या सुपुत्राला शिवसेनेचा भगवा हातात घ्यावा लागला आहे. बाळासाहेब ठाकरेंची ही शिवसेना आमचीच म्हणणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेनेचा द्वेष केलेल्यांना खासदारकीच्या आश्वासनासहित प्रवेश द्यावा लागला आहे. देवरा आणि ठाकरे हा संघर्ष काँग्रेस आणि शिवसेना असा कधीच नव्हता. तो काँग्रेसमधील अमराठी नेत्यांनी भरलेली आणि स्वत:ला आजही स्वतंत्रपणे प्रदेश संबोधणारी मुंबई काँग्रेस विरूध्द मराठी माणूस असा होता. तो प्रदीर्घ काळ सुरू राहिला. उच्चभ्रू दक्षिण आणि मध्य मुंबईचा भाग असलेल्या या लोकसभा मतदार संघातून भाजप शिवसेना युतीने दोनवेळा मुरली देवरा याना जयवंतीबेन मेहता यांनी पराभूत केले आणि 2004 साली सक्रिय मिलिंद देवरा यांना शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी दोनदा पराभूत केले. या दरम्यान राहुल गांधी यांच्याशी दुरावा, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना भाजपचे दार ठोठावावे लागणार असे दिसत होते. पण, भाजपकडे आधीच तिथून पालकमंत्री आणि बिल्डर मंगलप्रभात लोढा यांना लोकसभेवर पाठवायचे की राहुल नार्वेकर यांना तिकीट देऊन मराठी नेत्यांची झुंज लावायची हे ठरत नसताना देवराना कशाला चूचकारा असा विचार होत असावा. तिकडे मुंबईत शिंदे सेनेला उमेदवार हवे होते. तिथे राज्यसभा भविष्यात सुटूही शकते हा विचार झाला. पण, देवरा आणि शिंदे आपापल्या मतदारांना काय सांगणार? त्याचे उत्तर आजची गरज महत्त्वाची, पुढचे पुढे बघू असावे! पण, त्यामुळे इतिहास विसरला जात नाही. 70 च्या दशकात आणि नंतरही जेव्हा शिवसेना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपला प्रभाव पाडू लागली त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रात त्यांच्या आवडत्या
मॉडेलपैकी मिलिंद देवरा यांचे पिताश्री मुरली देवरा हे विशेष आवडते होते. इंदिरा गांधी यांच्या नावाचा वापर करून शिवसेनाच नव्हे तर महाराष्ट्र काँग्रेसवर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमराठी ग्रुपचे देवरा शिलेदार होते. स. का. पाटील यांचे साम्राज्य उद्ध्वस्थ केलेल्या बाळासाहेब ठाकरे यांचा द्वेष करणारा गुजराती आणि मारवाडी वर्ग होता. त्यांची सत्तेच्या दरबारात चलती होती आणि त्यामुळे उद्योगपतींची साथ होती. पोलीस आणि सरकारी यंत्रणा झुकायला तयारच होती. अशावेळी या भांडवलदार वर्गाचा काटा काढण्यासाठी शिवसेनेने इथे साम, दाम, दंड आणि भेद नितीचाही वापर केला. दाम सेनेला उपलब्ध व्हायचा. कारण, मराठी आणि अमराठी हा भेद सत्तेतील स्थानिक मराठी काँग्रेस नेत्यांनाही जाचत होताच! हा अमराठी वर्ग कधी उचल खाईल आणि आपल्याचपैकी दुसऱ्याच्या मागे भांडवल उभे करतील, सोबतीला दाक्षिणात्य पक्ष निरीक्षक, प्रभारी घेतील अन् सत्तेतून आपली उचलबांगडी होईल याची भिती मराठी नेतृत्वाला असायची. 80च्या दशकात तर असे अनेक मुख्यमंत्री आले-गेले. या काळात मुरली देवरा यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल जोरदार पराभूत झाल्यानंतर मुंबई प्रदेश काँग्रेस पंक्चर झालेले एक व्यंगचित्र बाळासाहेबांनी साकारले होते, जे देवरा यांच्या बाबतीत उर्वरित महाराष्ट्रात आयुष्यभर त्यांची तीच ओळख बनून गेले. पण, हा द्वेष बाळासाहेबांनी आयुष्यभर ठेवला नाही. पहिल्यांदा महापौर होण्यासाठी ठाकरेंनी देवरा याना मदतही केली होती आणि महाराष्ट्राचे जावई अशी उपाधी देऊन त्यांचे कौतुक आणि वाट बिकट करण्याचे राजकारणही केले होते. पुढे भाजप शिवसेनेची युती झाली आणि जयवंतीबेन मेहता यांनी दोनदा मुरली देवरा यांना पराभूत केले. देवरा यांची सद्दी संपत चालल्याचे हे द्योतक होते. मिलींद देवरा याच काळात आले आणि खासदार बनले. त्यांना अंबानींची साथ होती. कॉंग्रेस तेव्हा वाजपेयींच्या फिलगूड लाटेवर मात करुन यशस्वी झाली होती. मात्र गत निवडणुकीत अंबानी यांनी थेट देवरा यांना पाठिंबा जाहीर करूनही ते पराभूत झाले कारण थेट जनतेत असलेल्या अरविंद सावंत यांच्याशी त्यांचा दुसरा सामना होता. जनतेतील लढाई ही जव्हेरी, डायमंड व्यापारी आणि कापड उद्योजक, व्यापाऱ्यांच्या जीवावर जिंकता येत नाही हे मिलिंद देवरा यांच्यासारखे चांगले युवा नेतृत्व कधीही समजू शकले नाही. पक्षात अमराठी नेत्यांचे चालेना, मुंबई काँग्रेस अध्यक्ष माथाडी आणि कामगारांचा नेता झाला, दलित मंत्री आणि मुसलमान पालकमंत्री झाला त्यात आपले स्थान देवरा शोधत फक्त वाट बघत राहिले. काँग्रेसमध्ये असे आधुनिक राजपुत्र आणि आधुनिक रजवाड्यांची निक्रिय फळी आहे जी इतरांना दोष देत स्वत: आपल्या कर्तव्यापासून पळून चालली आहे. पक्षाने प्रचंड अन्याय केला असतानाही राजसन्यास सोडून ‘माझे घर जळत असताना मी बघत बसावं काय?’ असा प्रश्न करून त्वेषाने सक्रिय झालेले वसंतदादा पाटील एकीकडे आणि असा स्वत:चाच घात करू पाहणारी युवा पिढी दुसरीकडे असे काँग्रेसमधील दोन पिढ्यांतील स्थित्यंतर आहे. राहुल गांधी त्या जुन्या पिढीची अपेक्षा या नेत्यांकडून करतात ही त्यांचीही चूकच. आता देवरा यांचे भवितव्य भाजप ठरवेल. त्यासाठी लोढा आणि नार्वेकर यांना गप्प बसवून बाळा नांदगावकर यांना मनसेतर्फे मैदानात उतरवण्याची खेळी करावी लागेल आणि देवरांसाठी मुंबई महापालिका होण्यापूर्वी राज ठाकरे आपल्या शिलेदाराचा राजकीय बळी देणार नाहीत. मग राज्यसभेचा रस्ता तेवढाच उरतो. आपल्या प्रवेशाच्या भाषणात मोदी शहा यांचा उल्लेख मात्र फडणवीस यांचे नाव टाळून देवरा यांनी तिथेही गटबाजी केली. आपणच आपल्या वाटेत काटे टाकणाऱ्यांना त्यामुळे इतरांना दोषी ठरवता येत नाही. मात्र या वाटेने काँग्रेसचे आणखी कोणी जातात का? पाहायचे.