वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2026 करिता बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपनी गोदरेज प्रॉपर्टीज यांनी 40 हजार कोटी रुपये गुंतवून नवे प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यायोगे भारतीय बांधकाम क्षेत्रातील बाजारातील वाटा वाढवण्याचा कंपनीचा इरादा आहे.
सध्याला ही कंपनी बुकिंग विक्रीच्या माध्यमातून पाहता भारतातील आघाडीवरची बांधकाम क्षेत्रातील कंपनी ठरलेली आहे. गोदरेज प्रॉपर्टीचे कार्यकारी चेअरमन पीरोजशा गोदरेज यांनी वरील प्रकल्पासंबंधाची माहिती दिली आहे. जागतिक बाजारांमधील अनिश्चितता असतानाही भारतीय बांधकाम क्षेत्र हे योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगून मागच्या आर्थिक वर्षामध्ये घर विक्री बुकिंग च्या माध्यमातून कंपनीने 29 हजार 444 कोटी रुपये प्राप्त केले असल्याचे सांगितले आहे. कंपनी आगामी काळात जागा खरेदी करण्याची प्रक्रिया ही कायम सुरू ठेवणार असून विविध बांधकाम प्रकल्पांचा शुभारंभ येत्या काळात करणार आहे.
ऑक्टोबरमध्ये 6 हजार कोटी जमवले
क्यूआयपीच्या माध्यमातून मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीने 6000 कोटी रुपयांची उभारणी केली आहे. आवश्यक वाटल्यास अधिक गुंतवणूक करुन बांधकाम प्रकल्पांचा विस्तार वाढवण्यावर कंपनी येत्या काळात भर देणार असल्याचेही गोदरेज यांनी सांगितले.









