सातारा :
तालुक्यातील कोडोली येथील कॅनल लगत साई संगम हॉटेल जवळ जगदीश शिर्के यांच्या गोडाऊनला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये सर्विसिंग सेंटरचे साहित्य वाहनांचे पार्ट तसेच इलेक्ट्रिक साहित्य असा सुमारे एक कोटी रुपयांचा दोन्ही गोडाऊन मधील ऐवज जळून खाक झालेला आहे. रात्री अकरा वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. सातारा नगरपालिका अग्निशामक दलाचा बंब, कुपर कारखान्याचा बंब, आल्हाद जाधव मित्र समूहाचे टँकर यांच्या वतीने आघाटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.
सातारा शहरापासून काही अंतरावर कोडोली हे गाव आहे. या गावात उद्योजक जगदीश भाऊ शिर्के यांनी साई संगम हॉटेल नजीक प्रशस्त असे गोदाम बांधलेले आहे. या गोदामातील दोन गाळे भाड्याने दिलेले आहेत. त्या एका गाळ्यामध्ये सर्विसिंग सेंटरला लागणारे साहित्य तर दुस्रया गाळामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रिज, टीव्ही आदी साहित्य ठेवण्यात आलेले होते. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही कळायच्या आत मध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्य ठेवलेल्या ठिकाणाहून धुराचे व आगीचे लोट निघू लागले. बघता बघता दोन्ही ठिकाणी आगीने भक्ष स्थानी कवेत घेतले. कोडोली येथील स्थानिक नागरिकांनी लगेच मदतीच्या आशेने हंडे, कळशा घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र आगीचा विळखा एवढा जोरदार होता की दोन्ही गोदामातील सर्व साहित्य आगीमध्ये जळत होते, सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक बंब, कुपर कारखान्याचा अग्निशामक बंब लगेच पोहोचला, तसेच कोडोली येथील आल्हाद जाधव मित्र समूहाचे टँकरही घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचे रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले. मात्र या गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. दरम्यान सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचा फोन नंबर दाबण्याचा प्रयत्न केला असता तो लागला नाही.








