अध्याय सहावा
जो अनन्यशरण होऊन बाप्पांची भक्ति करतो त्याची गाठ बाप्पा ईश्वराशी घालून देतात आणि त्याचे कल्याण करतात. ह्या अर्थाचा अनन्यशरणो यो मां भक्त्या भजति भूमिप । योगक्षेमौ च तस्याहं सर्वदा प्रतिपादये ।।20।। हा श्लोक आपण पहात आहोत. मनुष्य एखाद्या गोष्टीच्या मागं लागला की त्याची तहान भूक हरपते. त्याला खाण्यापिण्याची शुद्ध रहात नाही. ती गोष्ट मिळवल्याशिवाय तो स्वस्थ बसूच शकत नाही. त्याला त्या गोष्टीच्या प्राप्तीखेरीज अन्य काही सुचतंच नसतं. यालाच अनन्यता असं म्हणतात. अशी अनन्यता ईश्वराबद्दल वाटू लागली की, त्याला ईश्वराशिवाय इतर काही नकोच असतं कारण तो जाणून असतो की, इतर सर्व गोष्टी नाशवंत असून केवळ ईश्वर एकटाच अविनाशी आहे. ज्याप्रमाणे लहान मूल रडू लागल्यावर त्याला इतर कोणत्याही गोष्टी उदाहरणार्थ खाऊ, खेळणी इत्यादि नको असतात. त्याला फक्त आणि फक्त आई हवी असते आणि तिनं कडेवर घेतल्यावरच ते शांत होतं. तसं अनन्य भक्ताला फक्त आणि फक्त ईश्वरच हवा असतो. माऊली म्हणतात तसं ईश्वरावाचूनि काही । आणिक गोमटेचि नाही । अशी त्याची अवस्था असते. असा भक्त त्याच्या भक्तीत रंगून गेलेला असतो. इतका की, त्याला जगाचं भानच राहिलेलं नसतं. मी नाही आणि तू आहेस असा त्याचा एकच ठेका असतो. हा समज दृढ असलेला भक्त अनन्यतेने ईश्वराची भक्ती करू लागला की, त्याचा योगक्षेम ईश्वराला चालवावा लागतो. त्याचं आत्यंतिक कल्याण होऊन त्याच्या आत्म्याचा ईश्वराशी संयोग होतो. यालाच योगक्षेम चालवणे असं म्हणतात. असं घडू लागलं की, तो ईश्वराचं चालतं बोलतं रूप होतो. त्याच्या चरितार्थाची सर्व कामं ईश्वर करत असतात आणि तो फक्त आणि फक्त ईश्वराचं चिंतन करत असतो. अशा परिस्थितीत तो जे जे करेल ते ईश्वराचं कार्य असतं. त्याला सर्वत्र ईश्वराचंच दर्शन होत असतं. तो जे जे करतो ती ईश्वराची पूजा ठरते, तो जे जे बोलतो तो ईश्वराचा जप होतो, तो जेव्हढं म्हणून चालतो ती ईश्वराची यात्रा होते, तो जे काही खातो ते ईश्वराला यज्ञात अर्पण केलेली आहुती होते, त्याची निद्रा तीच ईश्वराची समाधी होते. थोडक्यात सांगायचं म्हणजे अशा भक्तांच्या भक्तीच्या प्रकाशामुळेच ईश्वरी अवतार होतात, ईश्वरी लिलांनाही त्याची भक्ती कारणीभूत असते. अन्यथा ईश्वरी अवतार झालेच नसते. हे अनन्य भक्त अनुकूल, प्रतिकूल परिस्थितीत प्रसन्न असतात. जे काही वाट्याला आलंय ते ईश्वराने पाठवलंय आणि ते हितकरच आहे अशी त्याला खात्री असते. थोडक्यात अनन्य भक्तांच्या दृष्टीने दुसऱ्या कोणाचीच सत्ता नसते. तो जे करेल ती त्यांच्यासाठी पूर्व दिशा असते. त्यामुळे त्यांची आणि ईश्वराची इच्छा एकच असते.
अशा भक्ताची कामे ईश्वर स्वत:च करतात, त्यांच्या अडचणीला धावून जातात असे अनेक दाखले आहेत. त्यांनी अर्जुनाची घोडी धुतली, जनाबाईला दळण, कांडण करण्याला मदत केली, दामाजीपंतांनी गोरगरिबांना वाटलेल्या धान्याचे पैसे भरून त्यांचा तुरुंगवास टाळला. संत कबीर श्रीरामांची अशीच अनन्य भक्ती करत असत. म्हणून त्याच्यावर गदिमांनी एक सुंदर भावगीत रचलेलं असून श्रीराम स्वत: त्यांचा शेला विणून देतात असं मोठं बहारदार वर्णन त्यात केलेलं आहे. ते असं, कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम, बाई कौसल्येचा राम भाबड्या या भक्तासाठी देव करी काम। एक एकतारी हाती, भक्त गाई गीत। एक एक धागा जोडी, जानकीचा नाथ। दास रामनामी रंगे। राम होई दास। एक एक धागा गुंते, रूप ये पटास विणुन सर्व झाला शेला। पूर्ण होई काम। ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम। गुप्त होई राम हळू हळू उघडी डोळे पाही तो कबीर। विणोनिया शेला गेला सखा रघुवीर। असा हा अनन्य भक्तीचा महिमा असून अनेक संतांनी त्यांच्या अभंगातून त्याचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे.
क्रमश:








