अध्याय एकोणतिसावा
भगवंतांनी उद्धवाला सायुज्यमुक्ती प्रदान केली परंतु त्यावर तो समाधानी नव्हता. म्हणून तो भगवंतांना म्हणाला, देवा मला असा भ्रम वाटत होता की, जीवनमुक्ती झाली की सर्व मिळाले. जीवनमुक्तीपेक्षा श्रेष्ठ असे काहीच नाही पण आता असे लक्षात आले आहे की, जीवनमुक्ती मिळाल्यावर देह नसल्याने तुझी भक्ती करता येणार नाही. अशी कोरडी मुक्ती मला नको. तुम्ही देत असलेल्या सर्वश्रेष्ठ अशा सायुज्य मुक्तीपेक्षा श्रेष्ठ अशी गुरुभक्ती मला हवी आहे. ज्यांनी ज्यांनी भक्ती केली त्या सर्वांना मुक्ती देऊन तुम्ही ठकवले आहे पण तुमची ही युक्ती माझ्यापुढे चालणार नाही. ज्यांचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला ते सहजच आत्माराम झाले किंबहुना तो त्यांचा अधिकारच होता असे म्हंटले तरी चालेल. एव्हढे झाले तरी ते कोणताही हेतू मनात न बाळगता तुझी भक्ती करतात. हे लक्षात घेतल्यावर तुमच्या भक्तीचा त्याग करून मुक्ती जवळ करण्याची इच्छा बाळगणे हीच एक भ्रांती आहे ह्याची खात्री पटते. त्यामुळे मला मुक्ती न देता गुरुभक्ती करायची संधी द्या. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनीही देवाकडे अशीच मागणी करून संतसंग कायम मिळावा अशी मागणी केली होती. त्यासाठी मनुष्य देहाची आवश्यकता लक्षात घेऊन ते गर्भवासाचे दारूण दु:ख भोगायलाही तयार होते. ते त्यांच्या अभंगातून म्हणतात, हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।। गुण गाईन आवडी। हेचि माझी सर्व जोडी।। न लगे मुक्ती आणि संपदा। संत संग देई सदा।। तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावे आम्हासी।। आपण भगवंत आणि उद्धवाचा संवाद अभ्यासत आहोत. उद्धव भगवंतांकडे गुरुभक्ती करायची संधी द्या असे म्हणत होता. त्याला असे वाटले की, एकदा मुक्ती दिल्यावर परत देह देता येणार नाही असे भगवंत म्हणतील म्हणून तो पुढे म्हणाला, माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला असे करता येणार नाही असेही मला सांगू नका कारण तुमचे सामर्थ्य मी जाणतो. तुम्ही अशक्य ते शक्य करू शकता. जे मुळातच अस्तित्वात नाही त्याला अस्तित्व देता. उद्धवाचे बोलणे मोठ्या कौतुकाने भगवंत ऐकत होते. आधी त्याच्या मागणीनेच ते चकित झाले होते. त्यात त्याच्या मागणीचे समर्थन करताना तो त्यांची मागणी कशी न्याय्य आहे आणि भगवंत ती पूर्ण करायला कसे समर्थ आहेत हेही तो मोठ्या हुशारीने सांगत होता ह्याचेही भगवंतांना अप्रूप वाटत होते. उद्धव पुढे म्हणाला, तुमच्या सामर्थ्याबद्दल मी सांगावे असे नाही तरीपण सांगतो. तुमच्या सामर्थ्याची सहजी कल्पना येत नाही पण काही उदाहरणे पहिली की, त्याची ओळख पटते. उदाहरणार्थ, रामावतारात मोठमोठ्या शिळा ज्या तरंगणे केवळ अशक्य त्यांना तुम्ही तरंगायला लावलेत. त्यांचा आधार घेऊन त्यावर सेतू बांधलात आणि त्यावरून वानरसेना पलीकडे नेऊन महाबलाढ्या अशा रावणाचा वध केलात. रावणाकडे युद्धसामुग्री, पराक्रमी वीर, अस्त्रशस्त्र कशाकशाची कमी म्हणून नव्हती. तुमच्याकडे ना रथ, ना हत्ती, ना घोडे, तुमचे सैन्य कोणते तर पालापाचोळा खाऊन वनात हिंडणारे वानर पण तुम्हाला अशक्य शक्य करून दाखवणे काहीच अवघड नसल्याने रावणाचा तुम्ही लीलया पराभव केलात. तुमच्यामुळे वानरांचा केवळ उद्धारच झाला असे नाही तर चारही मुक्ती त्यांच्या दासी झाल्या. एव्हढेच नव्हे तर त्यांना सुरवरही वंदन करू लागले. गौळणी ह्या केवळ सामान्य स्त्रिया पण तुमच्या कृपेने त्या सामर्थ्यवान झाल्या इतक्या की, ब्रह्मदेव त्यांच्या चरणी लोटांगण घालू लागले. विशेष म्हणजे तुम्ही परमात्मा परमेश्वर आहात हे ना त्या गौळणीना माहित होते ना त्या वानरांना. तुझ्या देवपणाची कल्पना होती पण केवळ तुझे भजन केल्याचे फल म्हणून त्यांना परब्रह्माची प्राप्ती झाली असा तुमच्या भजनाचा अगाध महिमा आहे. तुम्ही संपूर्णपणे भक्ताच्या अधीन असता असे असताना तुमच्या भक्तीपुढे मोक्षाचे महत्त्व ते काय?
क्रमश:








