अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, मनुष्य स्वत: आत्मरूपच असतो परंतु देह धारण केला की, तो स्वत:ची मूळ ओळख विसरतो आणि सध्याच्या देहाची ओळख हीच स्वत:ची ओळख आहे असे समजतो. अशावेळी माझेच सगुण रूप असलेले सद्गुरू त्याला उपदेश करून त्याच्या मूळ स्वरुपाची ओळख करून देतात. ते सांगतात, आत्मा हा माझा अंश आहे. त्यामुळे तो माझ्याप्रमाणेच अविकारी आहे. विकार म्हणजे मनाचे आजार होत. ज्या मनुष्याला स्वत:च्या आत्मस्वरुपाची ओळख आहे त्याला इच्छा, द्वेष, सुख, दु:ख हे मनाचे विकार त्रास देत नाहीत कारण त्याला माहित असते की, मी म्हणजे माझे मन नव्हे तर मी म्हणजे आत्मा आहे. ह्याप्रमाणे ज्यांनी अभ्यास करून ज्ञान मिळवले ते सज्ञान होऊन स्वत: ब्रह्मरूपात विलीन झाले. जे ह्या प्रमाणे आत्मस्वरुपाची ओळख करून घेतात, त्यांना कायमचे मला येऊन मिळणे शक्य होते. आत्मस्वरुपाची ओळख करून घेण्याचे हे फळ समज. आत्मस्वरुपाबद्दल आणखीन सविस्तर माहिती देताना भगवंत म्हणाले, सोन्याचे मुकुट, कुंडले, करकंकणे असे अनेक अलंकार घडवतात. त्यातून सोने अनेक रुपात पुढे आणले तरी त्याचे सोनेपण काही लपत नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा कमीपणा येत नाही. त्याप्रमाणे मी माझा अंश वापरून अनेकांची निर्मिती केली, त्यांचे पालन पोषण केले आणि शेवटी संहार केला तरी त्यामुळे माझे स्वरूप आहे तसे नित्य राहते. माझे स्वरूप शुद्ध परब्रह्मस्वरूप असून ते नाना रूपांनी नाना नावांनी नटलेले असल्याने वेगवेगळे वाटते परंतु त्यातील ब्रह्मतत्व एकसारखेच असते. ज्याप्रमाणे सूर्याची किरणे सूर्यापेक्षा वेगळी निघून पृथ्वीतलावर पोहोचली तरी ती सूर्यापेक्षा वेगळी नसतात. त्याप्रमाणे पृथ्वीतलावर वावरणारे सर्व सजीव निर्जीव हे माझ्यापेक्षा वेगळे नसतात. उद्धव म्हणाला, असं जर आहे तर देवा सर्वांची वर्तणूक तुझ्यासारखीच हवी म्हणजे त्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागले बोलले पाहिजे, योग्य न्याय केला पाहिजे पण इथे तर बहुतेकजण स्वार्थी स्वभावाचे आहेत. आपल्या मनासारखे झाले की झाले असे प्रत्येकजण समजतो. मग सर्व सजीव निर्जीव तुझ्यासाखेच आहेत असे तू जे म्हणतोयस ते काही समोरची परिस्थिती बघितल्यावर पटण्यासारखे नाही. तुजे बोलणे मला नीट समजावून सांग. भगवंत हसले आणि म्हणाले उद्धवा, तुझी शंका रास्त आहे. लोकांचे वागणे आणि बोलणे बघितल्यावर हे माझ्यासारखेच आहेत हे कसे? असे वाटणे साहजिकच आहे. पुन्हा सोन्याचंच उदाहरण तुला देतो. ज्याप्रमाणे सोन्याचे अलंकार करून त्याला निरनिराळ्या स्वरुपात दाखवले तरी त्यातील सोन्याचा सोनेपणा काही कमी होत नाही. हे जरी खरे असले तरी शुद्ध स्वरूपातील सोने हे खूप मऊ असल्याने ते दागिने घडवण्याच्यावेळी केलेल्या हत्यारांचा सौम्यसा आघातसुद्धा सहन करू शकत नाही. त्यामुळे त्याला हवा तसा आकार देता येत नाही. म्हणून सोन्यापासून निरनिराळे दागिने करताना त्याला मनाप्रकारे आकार देता यावा म्हणून त्याला थोडे कठीण बनवावे लागते. त्यासाठी त्यात कमी जास्त प्रमाणात तांबे मिसळतात. त्याप्रमाणे मुळचे शुद्ध असलेले आत्मतत्व जेव्हा शरीरात प्रवेश करते तेव्हा ते निर्गुण, निर्विकार असते. देह हा मायेने तयार होत असल्याने, देहात प्रवेश केल्यावर मायेतील त्रिगुणांनी ते वेढले जाते. मनुष्य लहान असताना म्हणजे बाल्यावस्थेत असताना हे गुण माणसाच्या स्वभावात सारखेच असतात. तुकाराम महाराजांनी भगवंतांचे मनोगत अचूक ओळखले होते. म्हणून ते म्हणतात की, लहानपण देगा देवा म्हणजे लहान मुलाप्रमाणे त्यांचा स्वभाव निरागस व्हावा असे त्यांना वाटते. मनुष्य जसजसा मोठा होतो तसा सत्व, रज, तम ह्या त्रिगुणांपैकी ज्या गुणाचे त्याच्यात अधिक्य असेल त्याप्रमाणे त्याचा स्वभाव होतो.
क्रमश:








