लहान मुलांना अनेक प्रश्न पडतात. काही वेळा त्यांचे प्रश्न म्हणजे आपली परीक्षाच असते. परवा असेच काहीसे झाले. माझ्या मैत्रिणीचा मुलगा क्लासहून आला तो हाका मारतच, ‘ए मावशी. ऐक ना गं..’ कशाबशा चपला काढल्या आणि दप्तर बाजूला ठेवतच स्वारी धावतच आत आली. ‘मावशी तुला एक विचारायचे आहे. मला सांग मन पण आजारी पडतं का गं? शहाणा माणूस म्हणजे नेमकं काय?म्हणजे शहाण्या माणसाची व्याख्या काय?’
‘अरे..हो हो…सांगते. पण आजच तुला हे प्रश्न का पडले?’
‘अगं झालंच तसं..(विथ अॅक्शन स्टोरी सुरू झाली. मीही उत्सुकतेने ऐकत होते) मी आता क्लासहून बसने येत असताना माझ्याजवळ बसलेली ताई शेजारच्या सीटवर बसलेल्या काकुंजवळ मोठ्यांदा बोलत होती.’
मी-‘बरं..काय बोलत होत्या?’
एक दुसरीला म्हणाली, ‘तू कित्ती लकी आहेस गं.. तुझ्या घरचे सगळे छान आहेत. तुला समजून घेतात.’
दुसरी-‘हो..पण तुला काय झालं? तुझ्या घरचेही छान आहेत की..मी कित्ती वर्षे ओळखते आहे सगळ्यांना. सारं छान तर आहे.’
कप्पाळ…असं म्हणत तिने एवढ्या जोरात कपाळावर हात मारला की, कंडक्टर काकाही नेमकं काय झालं म्हणून पाहू लागले.
‘बरं..पुढे काय झालं?’
‘हं..ती म्हणाली.. एक माणूस शहाणा नाही आमच्याकडे. सगळ्यांच्या एक एक तऱ्हा..नवरा तसा बरा आहे पण जरा मठ्ठच.. सासूची वेगळी तऱ्हा.. मुलांची तर आणि वेगळीच तऱ्हा.’
दुसरी-‘का? त्यांचं काय झालं? रोज किती मदत करतात तुला.’
पहिली-‘हो गं…पण हे दुखतंय नी ते दुखतंय…नुसता वैताग..माझा मुलगा तसा हुशार आहे पण हा पसारा घालून बसतो..खूप दमणूक होते गं हल्ली…’
दुसरी-‘मग तुझ्या आईला बोलव की आठ दिवस..’
‘छॅ…ती कसली येते. ती मलाच म्हणते की तुला सगळ्यांचाच प्रॉब्लेम, माझं म्हणे कुणाशीच पटत नाही.’
ती दुसरी स्त्री हसून म्हणाली, ‘रागावू नको..पण तुलाच स्वत:मध्ये बदल करायला हवा. मन निरोगी असलं की सारं छान दिसतं. लोकांमधला शहाणपणा शोधण्यापेक्षा स्वत:च शहाणं झालेलं बरं. नाही का?’
‘तेवढ्यात स्टॉप आला आणि मी उतरलो गं.. मला प्रश्न पडला ती स्त्री म्हणत होती निरोगी मन..म्हणजे काय? मन पण आजारी पडतं का? शहाणा म्हणायचं कुणाला?’ सार्थकला एवढे प्रप्रश्न पडले होते की गाडी थांबतच नव्हती.
‘बरं…अस्स झालं होय..तू बस इथे. आपण चहा घेत बोलुया’ असं म्हणत सोप्या भाषेत.. थोडं गोष्टीरूपात त्याच्याशी संवाद साधत त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचं समाधान झाल्यावर तो खेळायला निघूनही गेला. सार्थकने विचारलेला प्रश्न विचार करायला लावणारा होता कारण शहाणपणा आणि निरोगी मनाची व्याख्या करणे हे तसे अवघडच!!
शरीराच्याबाबत बोलायचे झाले तर शरीरयष्टी, उंची, वजन, शरीराची काम करण्याची क्षमता याबरोबरच इतर काही गुण वैशिष्ट्यांसोबत आपण शारीरिक आरोग्याचे मोजमाप करत असतो. पहा, उत्तम शारीरिक आरोग्य, बलवान शरीर म्हटल्यावर हनुमान, भीमासारखी प्रतिमा नजरेसमोर येते परंतु तसे असले तरी प्रत्यक्षात मात्र प्रत्येक निरोगी वा सुदृढ शारीरिक आरोग्य असलेल्या व्यक्तीला भीमा इतके बलवान असण्याची गरज नाही. अगदी तसेच मानसिकदृष्ट्या निरोगी म्हणजे कोणतीच त्रुटी नसलेली, अगदी परफेक्शनिस्ट, बिनचूक, सर्वगुणसंपन्न अशी व्यक्ती असा अर्थ नाही. निरोगी स्वभावामध्येही गुण दोष, उणीवा असतात. मानसिक आरोग्य-अनारोग्य यामधील सीमारेषा काहीवेळा सुस्पष्ट-ठळक तर काहीवेळा पुसटही असते. दैनंदिन जीवनात आपल्याला कितीतरी माणसं अशी भेटतात की ज्यांना मनोऊग्ण म्हणता येत नाही परंतु त्यांची वागणूक खटकण्याइतकी विचित्र असते.
काही माणसं इतकी आत्मकेंद्री असतात की, त्यांना कशाचेच काही पडलेले नसते तर काहींना सगळ्याच्या हो ला हो म्हणायची सवय असते. स्वत:चे मतच नसते. या ‘होयबा’ना भावनिकदृष्ट्या सतत अवलंबित्व असते. म्हणजेच अती आत्मकेंद्री वृत्ती वा अती परावलंबित्व ही दोन्ही टोके घातकच.
दुसरे उदाहरण द्यायचे तर प्रेमाचे, मायेचे देता येईल. आईचे आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असते. माया असते. त्यातूनच अनेकदा तिला मुलांची काळजी वाटत असते. परंतु याचा अतिरेक झाला आणि तिने जर मुलांना नजरेआड होऊच दिले नाही तर त्याला निरोगी प्रेम म्हणता येईल का?
आपुलकी, जिव्हाळा, आस्था हे निरोगी मनाचे विविध पैलु आहेत परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक धोकादायकच. निरोगी मने एकमेकांना ‘माणूस’ म्हणून ओळखतात. मतभेद असले तरी एकमेकांप्रती आदरभाव असतो.
खरंतर एकमेकांशी संवाद साधणे ही गरज आहे परंतु एखादी व्यक्ती सर्वत्रच सारं सांगू लागली तर ते जितके अयोग्य तितकेच न बोलता घुसमटत राहणे हेही हानिकारकच.
थोडक्मयात निरोगी मनासाठी ‘भावनिक साक्षरता’ गरजेची आहे. त्यासाठी स्व:च्या भावनांची जाण असणे, भान असणे, दुसऱ्याच्या भावनांना ओळखून त्याची कदर करणे, स्वत:च्या मनातील सततची काळजी, नैराश्य, भीती, वैफल्य, सूड, मत्सर, क्रोध आदी अनेक विघातक भावना ओळखून त्यांना वेळीच आवर घालण्याचे कौशल्य असणे अभिप्रेत आहे. तसेच कोणतेही टोक न गाठता परस्पर सहकार्याने प्रŽ सोडविणे, भावनिक वादळांना सामोरे जाणेही गरजेचे आहे.
निरोगी मनाचा विचार करताना सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी ‘मनाच्या श्लोकां’च्या माध्यमातून केलेला उपदेश तर सर्वज्ञातच आहे. खरंतर विचार आणि भावनांचा पल्ला खूप मोठा असल्याने वेगवेगळ्या भूमिकांमधून विचार करता येणे आणि इतरांना समजून घेता येणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे.
वास्तवाची जाणीव, सहानुभूती (sympathy) आणि परानुभूती(Empathy) गरजेची आहे. माणसाच्या आयुष्याचा आधार असलेली खूप महत्त्वाची अशी तीन नाती सांगता येतील. एक नाते-निसर्गाशी, दुसरे-मानवजातीशी, तिसरे नाते-स्वत:शी.. आजच्या गतिमान जीवनशैलीमध्ये भावनिक कौशल्यांचा विकास साधत ही तीनही नाती जर जोपासता आली तर ते सर्वार्थाने उत्तम ठरेल. निरोगी मनासाठी ते आवश्यकही आहे. निरोगी मन समरसून जगते, जीवनातील चढउतार आनंदाने पार करते, कुतूहल जिज्ञासा राखते, छोट्याशा स्तुतीने हुरळूनही जात नाही आणि अपयशाने निराशेच्या गर्तेत बुडूनही जात नाही. आत्मपरीक्षण करत उणीवा जाणून त्या दूर करण्यासाठी मार्गदर्शन घेण्याचे, प्रयत्न करण्याचे शहाणपणही देते.
थोडक्यात आपली बलस्थाने, उणिवा यांची पुरेशी जाणीव आणि लवचिकतेने सकारात्मक बदलाच्या दिशेने प्रवास झाला तर यापेक्षा शहाणपण वेगळे ते काय असेल?
-अॅड. सुमेधा संजीव देसाई








