कोणती गोष्ट शिकवणे किंवा शिकणे यासाठी कान आणि डोळे तत्पर असायला लागतात. कानाने ऐकलेलेसुद्धा एकपाठी ग्रहण करणारी मंडळी असतातच की. पण कानाबरोबर डोळ्यांनी टिपणारी मंडळी उत्तम ग्रहणशील असतात हे सिद्ध झालेले आहे. कारण कानाला विशिष्ट अंतरानंतर मर्यादा येतात पण डोळ्याला मात्र बुद्धीच्या जोरावर कल्पनाचित्र रेखाटता येत असल्यामुळे माणसं खऱ्या अर्थाने डोळस ठरतात. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला असे ज्ञान मनोबलाने देणारा श्रीकृष्ण त्याच्या कानाबरोबरच डोळ्यांपुढे देखील विराट चित्र उभे करतो. ज्याला आम्ही विश्वदर्शन असं म्हणतो. तीच ही प्रक्रिया जी अर्जुनाबरोबर संजयालासुद्धा बघता आली. पण धृतराष्ट्र मात्र कळत असुनसुद्धा न कळणारा अंध ठरतो. धृतराष्ट्र पुत्र प्रेमाने अंध झालेला, सत्ता प्राप्तीसाठी हपापलेला आणि म्हणूनच गीतेच्या सुरुवातीला या धृतराष्ट्राचा पहिलाच प्रश्न येतो ‘धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ तिकडे युद्धभूमीवर नेमकं काय घडतंय? ते मला सांगा! कारण फक्त युद्धच घडावं आणि पांडव संपावेत अशी आयुष्यभर व्यवस्था करणारा धृतराष्ट्र अधर्माने पछाडल्यामुळे आपलं आंधळेपण जगासमोर मांडत होता. अशा अविचारी विचारांची कृती दाखवणारी माणसं डोळे असून आंधळी असतात. याचे उदाहरण म्हणजे आम्ही जे योजलेलं असतं किंवा पूर्वग्रहाने विचार केलेला असतो त्यानुसारच आम्ही निष्कर्ष काढतो आणि कृती करायला सज्ज होतो. याची एक कथा चक्रदेवांनी आपल्या हत्तीच्या दृष्टांतात खूप छान सांगितली आहे. गावात एक हत्ती येतो आणि दहा आंधळी माणसं तो हत्ती बघायला जातात. एक जण पायाला हात लावून बघतो आणि ठामपणे सांगतो की हत्ती खांबासारखा आहे. दुसरा कानाला हात लावतो आणि सांगतो हत्ती सुपा सारखा आहे. शेपटी धरणारा माणूस दोऱ्यासारखा हत्ती आहे असं सांगतो तर सोंड धरणारा माणूस हत्ती नळीसारखा आहे असं सांगतो. अशा या सगळ्या निष्कर्षामुळे हत्ती जसा हाताला जाणवला तसं त्याचं वर्णन आलेलं आहे. म्हणजेच आपण स्वत:ला सगळं समजतं अशा थाटात एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगायला गेलो तर त्यांना त्यातील आपल्यातला आंधळेपणाच लक्षात येतो. आम्ही रोजच्या जगण्यात सुद्धा एखाद्या व्यक्तीबद्दल चटकन निष्कर्ष देऊन टाकतो पण आम्हाला त्याच्या इतर चांगल्या गुणांची कल्पना आलेली नसते. कारण आमच्याकडे तिच्याकडे बघण्याची तशी नजरच नसते. अशावेळी ज्ञानदेवांच्या मोरपिसाचा दृष्टांत उपयोगी पडतो. मोराच्या पिसाला हजारो डोळे असतात पण बघण्याची दृष्टीच नसते. म्हणजेच जगामध्ये हजारो लोक डोळे असलेले दिसले तरी त्यांना जगाकडे, परिसराकडे बघण्याची दृष्टी असतेच असे नाही आणि म्हणूनच अशी दृष्टी मिळण्यासाठी आम्हाला योग्य गुरू योग्य शिक्षक आणि योग्य मार्गदर्शक आवश्यकच असतो आणि तेव्हाच आम्हाला डोळसपण आले देवा असं म्हणता येईल.
Previous Articleस्टोक्सच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया?
Next Article सर्बिया अंतिम फेरीत दाखल
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








