अध्याय एकोणतिसावा
सद्गुरूमहात्म्य सांगून झाल्यावर नाथमहाराज पुढील कथानक सांगत आहेत. ते म्हणतात, अठ्ठाविसाव्या अध्यायात भगवंतांनी ब्रह्माचे परिपूर्ण वर्णन केले. त्याचे परम श्रद्धेने सेवन केल्यामुळे उद्धवाला पूर्ण समाधान लाभले. उद्धव स्वत: तृप्त झाला आणि त्याने विचार केला की, हे आत्मज्ञान सर्वसामान्य कुवतीच्या लोकांना मिळालं पाहिजे परंतु ब्रह्मस्थिती समजायला कठीण आहे. ती सर्वांना समजण्यासाठी देवांनी काहीतरी उपाय सांगितला तर बरे होईल असा विचार करून त्याने भगवंतांना त्याबद्दल लगेचच विनंती करायचे ठरवले. भगवंत निजधामाला गेल्यावर साधकांच्या हाताला ब्रह्मप्राप्ती लागणार नाही हे लक्षात घेऊन साधकांच्या हितासाठी उद्धवाला त्यांचा कळवळा दाटून आला. त्यातूनच त्याने ब्रह्मज्ञान सोप्या पद्धतीने मिळावे अशी भगवंतांना विनंती केली. उद्धवाची ही मागणी भगवंतांना अतिशय आवडली. ते आता या संसारसागरातून ज्यांना पोहता येत नाही त्यांना त्यातून सहजी पार होण्यासाठी वाट कशी मिळेल ते सांगणार आहेत. त्यामुळे एकोणतिसाव्या अध्यायाचे निरुपण हे ब्रह्मप्राप्ती सहजपणे कशी प्राप्त होईल ह्यावर भर देणारे आहे. ह्याबाबत भगवंत उद्धवाला सविस्तर सांगत आहेत. अध्यायाच्या सुरवातीला देवांना त्याबाबतीत विनंती करावी ह्या उद्देशाने उद्धव देवांना म्हणाला, ‘देवा, तुम्ही अत्यंत विस्तृतपणे ब्रह्मज्ञानाचे महात्म्य मला समजाऊन सांगितलेत परंतु हे सगळं ब्रह्मज्ञान सामान्य माणसाच्या पचनी पडणं फार अवघड आहे. तेव्हा ज्यांचा तुमच्यावर पूर्ण सदभाव आहे पण ब्रह्मज्ञान कळणे कठीण आहे अशा अज्ञ जनांसाठी ब्रह्मप्राप्तीचा अत्यंत सोपा उपाय सांगा. आधीच्या अध्यायात तुम्ही ब्रह्मस्थिती सांगितलीत खरी पण ती समजण्यासाठी अतिशय कठीण आहे. त्यामुळे भोळ्dया भाविक अज्ञानी लोकांना ही ब्रह्मप्राप्ती होणे फार अवघड आहे. आता ब्रह्मस्थितीबद्दल बोलायचं झालं तर ती व्यक्तही नाही आणि अव्यक्तही म्हणता येत नाही. प्रकटही नाही की, गुप्तही नाही. मूर्त आहे का अमूर्त आहे हेही समजत नाही. स्थूल आहे की सूक्ष्म आहे हेही कळत नाही. आहे की नाही हेही लक्षात येत नाही. समोर दिसतीये ती गोष्ट ब्रह्म आहे हे म्हणावे तर ती नाशवंत असल्याने मायारूप आहे हे समजते. असं सगळं असल्याने साधक त्यावर फारसा विचार करू शकत नाहीत मग ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची कशी हेच समजत नाही. त्यातून साधकाने त्यादृष्टीने काही प्रयत्न करावा म्हणून ठरवलं तर त्याला मन कशावर स्थिर करावं हेच कळत नाही. अशा अज्ञानी लोकांना ही योगसाधना दुस्तरच म्हणायची. त्यामुळे सामान्य संसारी जनांच्या हाती ब्रह्मप्राप्ती लागायचं एकुणातच अवघड वाटतं. तेव्हा ही आत्मस्थिती सगळ्यांच्या पदरात पडेल अशी सोपी साधन पद्धती कृपा करून तुम्ही सांगा. तुम्हाला आत्ताच ही विनंती करायचं कारण म्हणजे, तुम्ही आता तातडीने निजधामाला जायचं ठरवलंय! असं जर झालं तर अज्ञानी लोकांना ब्रह्मप्राप्ती होणं अशक्य होऊन बसेल. असं म्हणून उद्धव धावत धावत देवापाशी गेला. त्यांना त्याने लोटांगण घातले आणि श्रीकृष्णाचे चरण पकडले आणि म्हणाला, ज्याप्रमाणे जिना उतरून मनुष्य सहजी वरच्या मजल्यावरून खाली उतरतो त्याप्रमाणे अज्ञ जनांना संसार सागर तरुन जाण्याच्यादृष्टीने ब्रह्मप्राप्ती कशी करून घ्यावी ह्याचे अगदी सोपे साधन कृपया सांगा. हे कृष्णा, कमलनयना साधक साधना करताना त्रासणार नाही असा उपाय सांगा. साधकांची योगसाधना करावी अशी इच्छा नसते असे नाही. मनाचा निग्रह साधण्यासाठी साधक प्राणायाम करावा असे ठरवतो परंतु त्याचे मन त्याला छळून काढते. ते क्षणभरसुद्धा स्थिर राहू शकत नाही. एकांतात आसन घालून मनाचा निग्रह करून त्याला एकाग्र करावे असे त्याला वाटत असते पण त्याचे मन त्याला ठकवून केव्हाच दुसरीकडे निघून जाते. मनोनिग्रह करायचा म्हणून कुणी स्वत:ला कोंडून घेतात परंतु त्याचा काहीही उपयोग न होता, त्यांचे मन अत्यंत चपळतेने तेथून निघून जाते.
क्रमश:








