अध्याय सोळावा
एकनाथी भागवतातल्या सर्व अध्यायात काय काय सांगितले आहे ते आपण थोडक्मयात बघितले. आता पुढील भाग अभ्यासूया. मागच्या कथेचा संदर्भ असा आहे की, पंधराव्या अध्यायाच्या शेवटी माझ्या प्राप्तीला सिद्धी या बाधक होतात असे श्रीकृष्ण म्हणाले. सिद्धींवरचे ध्यान सोडून देऊन माझ्याच स्वरूपामध्ये मन ठेवावे. हे श्रीकृष्णाचे भाषण ऐकल्यावर भगवंतांच्या स्वरूपाबद्दल उद्धवाला विलक्षण उत्सुकता निर्माण झाली आणि भगवंतांचं अस्तित्व कुठं आणि कोणत्या रूपात असतं हे जाणून घ्यावं म्हणून त्यानं भगवंतांना प्रश्न विचारला. श्रीकृष्णनाथा ! समर्था ! माझी एक विनंती ऐक. तुझ्या ज्या विभूती असतील त्या सर्व मला सांग. भूत आणि भौतिक याचे कारण तूच जन्म, स्थिती आणि लय तुझ्यामुळेच होतात आणि इतकेही करून तू अकर्ताच आहेस, म्हणूनच तू परिपूर्ण ब्रह्म आहेस. प्राण्यांना उत्पत्ती, स्थिती व लय ही प्रकृतीमुळे प्राप्त होते पण ती प्रकृती म्हणजे माया तुझ्या आधीन असते. तुझ्यामुळेच प्रकृतीला चालना मिळत असल्याने प्रकृती परतंत्र आहे. तू परमात्मा स्वतंत्र आहेस. तू अनादि, अव्यय आणि अपार आहेस. वेदांनासुद्धा तुझा पार लागत नाही. प्रकृतीला तुझे आवरण आहे. तू अनंत असल्यामुळे आवरणरहित आहेस. तू स्वतः जीवांचे स्वरूप आहेस पण तुला मात्र जीवपणा नाही. जितके म्हणून जीव आहेत ते सर्व अज्ञानाने युक्त आहेत आणि तू खरोखर ज्ञान व अज्ञान ह्यांहूनही पलीकडचा आहेस, म्हणूनच तू अविनाशी व अपरोक्ष असून साक्षात् परब्रह्म आहेस. आता मी अपरोक्ष म्हणजे न दिसणारा कसा ? असे विचारशील, तर तूं सर्वामध्ये सर्वत्र अंतर्बाह्य आहेस आणि असा व्यापलेला असूनही, श्रीकृष्णा ! तू अतक्मर्य आहेस. ब्रह्मवेत्ते लोकच यथार्थरूपाने तुझी उपासना करतात. माशीपासून हिरण्यगर्भापर्यंत सर्व प्राणिमात्रांमध्ये निरंतर अंतर्बाह्य व्यापून असणाऱया अशा तुला ब्राह्मण वेदाच्या अर्थावरून निश्चितपणे जाणतात किंवा जे कोणी उपनिषदांचे यथार्थ रहस्य जाणतात आणि तुझ्या ठायी भजनयुक्त असतात, ते सर्वव्यापी असा तू सर्वात्मा आहेस असे निश्चितार्थाने समजतात. त्या तुज सर्वात्म्याचा अंतपार पाहूं गेले असता तू अचिंत्य व अनंत ऐश्वर्ययुक्त आहेस. ही झाली ज्ञानी लोकांची कथा पण
तुला जे सामान्य लोक जाणत नाहीत, त्यांचा विचार करणं आवश्यक आहे. जे आपले मन आणि इंद्रिये आपल्या ताब्यात ठेवू शकत नाहीत, ते तूला जाणू शकत नाहीत. जे मनाला विकलेले असतात, कामेंद्रियांचे दास बनतात, जे जिव्हेचे पोसणे होतात आणि ज्यांना निदेने जणू काय आपले घरजावईच केलेले असते. अशा सर्वांना, तुझे जे स्वतःसिद्ध व सर्वव्यापक स्वरूप आहे, त्याची कल्पनाही करता येत नाही. आपल्या देहातच आत्मस्वरूप आहे हे त्यास कळत नाही. ते सदासर्वदा विषयातच भुललेले असतात. विषयात त्यांचे अंतःकरण चंचल झालेले असते. त्यांना सगुण स्वरूपाचेही ध्यान होत नाही आणि त्यांचे मन निर्गुण स्वरूपात शिरतच नाही. असे अज्ञानी लोकांनाही स्वतःचा उद्धार करून घेता यावा म्हणून अनेक प्रकारची शास्त्रे न धुंडाळता व ध्यानधारणेच्याही भरीस न पडता केवळ ज्यांचं भजन केलं असता ते तरून जातील, अशा प्रकारच्या ज्या तुझ्या उत्तमोत्तम विभूती असतील त्या निश्चयेकरुन सांग. तुझ्या ज्या ज्या विभूतींची संतांनी पूर्वी दृढ भावनेने भक्ती करून उपासना केली व तुझ्या स्वरूपाला पोचले. त्या तुझ्या सर्व विभूती, त्यांची स्थिती कशी ? त्यांची स्वरूपे कोणती ? त्यांची भक्ती कशी ? त्यांपासून कोणती गती प्राप्त होते हें निश्चयेकरून मला सांग. आता ह्यावर तू म्हणशील की, सर्व वस्तुमात्रामध्ये माझ्या विभूती तूच ओळख म्हणजे झाले. तर ते तुझे स्वरूप अतक्मर्य आहे. श्रीकृष्णा! ते कांही आमच्याने ध्यानात आणवत नाही. सर्व प्राणिमात्रांच्या हृदयामध्ये तूच आहेस. पण हृदयात असूनही तू गुप्त आहेस. देह हाच मी अशा भ्रमामुळे सर्व प्राणी तुला पहात नाहीत. हे देवराया! त्या देहभ्रमाला मूळ कारण तुझी माया आहे, पण त्यातच तुझी कृपा झाली तर ती माया गुणांसहवर्तमान लयास जाते.
क्रमशः








