अध्याय पहिला
दोन्ही सैन्यातील वीरांचे वर्णन करून झाल्यावर दुर्योधनाने सर्वांना सूचना दिली की, व्यूहरचनेप्रमाणे नेमलेल्या ठिकाणी उभे राहून भीष्मांचे सर्व बाजूंनी रक्षण करा. आपले महत्त्व वाढवणारे दुर्योधनाचे बोलणे ऐकून भीष्म संतुष्ट झाले. दुर्योधनाला आनंद वाटावा म्हणून कुरुकुलातील वृद्ध, प्रतापी भीष्मानी सिंहाप्रमाणे मोठी गर्जना केली आणि शंख वाजवला. भीष्मांनी केलेली सिंहगर्जना आणि त्यांनी फुंकलेल्या शंखाचा आवाज हे दोन्ही जेव्हा एकत्र झाले तेंव्हा त्याची तीव्रता त्रैलोक्याच्या कानठळ्या बसवण्याएव्हढी होती. त्यावेळी जणू काय आकाशच तुटून पडते की काय असे वाटले. त्यामुळे आकाश गडगडू लागले, सागर उसळला आणि स्थावर व जंगम थरथर कापू लागले. त्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या दणाणून गेल्या.
पुढील श्लोकात संजय म्हणाला, त्याक्षणी कौरव सैन्यात शंख, नगारे, ढोल, मृदंग आणि कर्णा ही सर्व रणवाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा एकत्रित झालेला आवाज भयंकर होता.
तक्षणी शंखभेर्यादि रणवाद्ये विचित्र चि । एकत्र झडली तेंव्हा झाला शब्द भयंकर ।। 13 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, संजयाने राजाला असे सांगितले की, भीष्मांनी सिंहनाद करून शंख वाजवल्यावर नाना प्रकारची रणवाद्ये इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली की, मी मी म्हणणाऱ्यांनाही तो महाप्रलय वाटला. नौबत, डंके, ढोल, शंख, मोठ्या झांजा, कर्णे आणि महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना या सर्वांची एकच गर्दी झाली. योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले, कोणी चिडून एकमेकांना युद्धासाठी हाका मारू लागले, मदोन्मत्त हत्ती आवरेनासे झाले. तेथे कच्चे लोक तर कस्पटासमान उडून गेलेच पण प्रत्यक्ष यमाला सुद्धा धाक पडला. तो गर्भगळित झाल्याने त्याचा पायच ठरेना. त्यापैकी कित्येकांचे तर उभ्याउभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान होते, त्यांची दांतखिळी बसली आणि मी मी म्हणणारे नामांकित वीर थरथर कापू लागले. असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला व आज प्रलयकाल येऊन ठेपला, असे देव म्हणू लागले. त्याचवेळी इकडे पांडवांच्या सैन्यात काय झाले ते सांगताना पुढील श्लोकात संजय म्हणाला, विजयाचा गाभा असलेल्या, महातेजाचे भांडार असलेल्या, वेगात गरुडाची बरोबरी करणारे चार पांढरेशुभ्र घोडे जुंपलेल्या महान् रथावर आरूढ होऊन आलेल्या श्रीकृष्ण व अर्जुन यांनीही आपले दिव्य शंख वाजवले.
इकडे शुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथातुनी । माधवे अर्जुने दिव्य फुंकले शंख आपुले ।। 14 ।।
माऊली श्लोकाच्या विवरणात म्हणतात, संजयाने अर्जुनाच्या रथाचे वर्णन करताना राजाला असे सांगितले की, विजयाचा गाभा असलेला अर्जुनाचा रथ महातेजाचे भांडार आहे, वेगात गरुडाची बरोबरी करणारे चार घोडे त्याला जुंपलेले आहेत. त्यांच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या आहेत. जणू दिव्य असे पंख असलेला मेरु पर्वतासारखाच तो दिसत आहे. रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर शंकराचा अवतार असलेले मारुतीराय आहेत व शारंगधर श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी आहेत. पहा त्या प्रभूचे नवल! भक्ताविषयीच्या विलक्षण प्रेमापोटी तो सर्वशक्तिमान परमेश्वर, अर्जुनाच्या सारथ्याचे काम करत आहे. विनोबा गीताई चिंतनीकेत म्हणतात, आपल्या दासाला पाठीशी घालून तो स्वत: पुढे उभा राहिला. लढाईत भाग घेणार नाही, असे म्हणणारा श्रीकृष्ण पांडवांच्याकडून शंख वाजवण्यात मात्र पहिला आहे. त्याने शंखनाद करून आपल्या प्रिय भक्ताची बाजू घेऊन त्याच्या रक्षणासाठी ढाल बनून मी त्याच्या पुढे उभा आहे हे उघड उघड जाहीर केले.
क्रमश:








