‘भगवान देता है, तो छप्पर फाड के देता है’ अशी एक म्हण आहे. तिचा अर्थ असा की भाग्य फळफळले, तर रंकाचा राव होऊ शकतो. असाच अनुभव मध्यप्रदेशातील सागर येथील स्वामी दीन पाल नामक एका रोजंदारीवर जीवन कंठणाऱ्या एका कामगाराला नुकताच आला आहे. अवघ्या तीन महिन्यांमध्ये त्याचे दिवसच पालटले. ‘उद्याची भ्रांत’ असणारा हा कामगार कोट्याधीश झाला आहे.
मध्यप्रदेशातील पन्ना येथे हिऱ्यांच्या खाणी आहेत. इतिहास काळापासून आजपर्यंत येथे नैसर्गिक हिरे सापडत आलेले आहेत. जगातील सर्वात मोठा मानला गेलेला कोहिनूर हिरा हा याच प्रदेशातील खाणीत सापडला होता, अशी वदंता आहे. या प्रदेशात आजही हिरे सापडतात. काही वेळा तर हिरे शोधण्यासाठी खोलवर खणावेही लागत नाही. भूमीच्या अगदी वरच्या भागात, किंवा भूमीच्या पृष्ठभागावरही लहान-मोठे कच्चे हिरे सापडल्याच्या घटना घडल्या आहेत.
अशाच प्रकारे, दीन पाल यांना पन्नाच्या प्रदेशात काम भूमी खननाचे काम करीत असताना पृष्ठभागावरच एक हिरा सापडला. प्रारंभी तो हिरा आहे, याची त्यांना कल्पना नव्हती. तरीही एक वेगळा दिसणारा दगड म्हणून त्यांनी तो स्वत:जवळ ठेवला. नंतर तो हिरा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या हिऱ्याची विक्री करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पन्ना येथे भूपृष्ठभागावर जर कोणाला हिरा सापडला तर तो त्याचाच असतो. सरकार त्याच्यावर आपला अधिकार सांगत नाही. अशा लोकांना सापडलेल्या हिऱ्यांचा लिलाव केला जातो आणि या हिऱ्यांची किंमत आणि गुणवत्ता निर्धारित करण्याचे काम तज्ञ लोक करतात. अशाच प्रकारे दीन पाल यांच्या हिऱ्याचे वजन करण्यात आले, जे 32.80 कॅरट इतके भरले. त्याची किंमत त्यांना लिलावाच्या बोलीत 2 कोटी 21 लाख 72 हजार 800 रुपये मिळाली. अशा प्रकारे दीन पाल कोट्याधीश झाले आहेत. ते आपल्या या परम भाग्योदयाचे श्रेय अर्थातच परमेश्वराच्या कृपेलाच देत आहेत. या धनाचा उपयोग ते आपल्या मुलांसाठी शेती घेण्यासाठी, तसेच पक्के घर बांधण्यासाठी करणार आहेत. गरीबांना साहाय्य करण्याचीही त्यांची योजना आहे.









