अध्याय सत्ताविसावा
सत्संगाने भगवद्भजन घडत असते आणि त्यामुळे साधकांच्या अंगी पूर्ण वैराग्य येते. भगवद्भक्ति केल्याशिवाय विरक्ती कधीच उत्पन्न होत नाही. भक्ती म्हणजे ईश्वरावर निरपेक्षपणे प्रेम करणे. ईश्वरावर प्रेम जडल्याची प्रचीती म्हणून मनुष्याला संसारातील गोष्टी निरर्थक आहेत हे लक्षात येऊ लागते. त्यापूर्वी स्त्री, पुत्र, देह हे सर्व माझं आहे असं माणसाला त्याच्या अहंकारामुळे वाटत असते. अहंकारामुळे आपली त्यावर मालकी आहे असे तो समजत असतो परंतु सर्वजण ईश्वराच्या मर्जीनुसार येथे येतात, राहतात आणि वेळ झाली की निघून जातात मग कुणाची मालकी असण्याचा प्रŽच येत नाही. अनुभवाने कोणत्याही व्यक्ती, वस्तू वा परिस्थितीवर आपली मालकी नाही हे जेव्हा माणसाच्या लक्षात येते, तेव्हा त्याचा अहंकार नष्ट होतो आणि त्याला विरक्ती येते आणि एक कर्तव्य म्हणून तो संसारिक कर्मे निरपेक्षपणे करू लागतो. साहजिकच आहे, जी गोष्ट आपल्या मालकीची नाही त्याबद्दल आपलेपणा न वाटणे हा मनुष्य स्वभाव आहे. त्यापूर्वी माणसाला आपल्या गोतावळ्याबद्दल आणि आपल्या देहरूपाबद्दलही ममत्व वाटत असतं. ममत्वातून अपेक्षा निर्माण होतात म्हणून हे ‘मी’ आणि ‘माझे’ चं आसक्तीयुक्त प्रेम होय. ते नष्ट होणं म्हणजे विरक्ती! अशी विरक्ती आल्याशिवाय भगवत्प्राप्ती कधीही होत नाही. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत त्याप्रमाणे प्रपंचाबद्दल आसक्ती आणि भगवद्भक्ती एकत्र नांदू शकत नाहीत. श्रीकृष्णाने हे सर्व सांगितल्यावर उद्धवाला भगवद्भजन करण्याची विलक्षण ओढ लागली. म्हणून त्याने भगवंताना विनंती केली की, मला पूजाविधी सविस्तर सांगा कारण तुमच्याएव्हढा अचूक तो कुणालाच माहित नाही. देवषी नारद, भगवान व्यास आणि आचार्य बृहस्पती इत्यादी मुनी वारंवार पूजाविधी हे मनुष्याच्या परम कल्याणाचे साधन आहे, असे सांगतात. भजनाचा महिमा अपूर्व आहे. त्याच्या योगाने अधमालाही उत्तमोत्तम पदवी प्राप्त होते. भक्त भगवद्भक्ती करूनच स्वत: देवरूप होतात. तुझे भजनपूजन केले असता तू आपल्या भक्तांना तारतोस, भक्तराज प्रल्हादाचे उदाहरण सर्वांना माहित आहेच. तूच भक्तांना सन्मानदाता होतोस, याकरिता तुझ्या पूजेची पद्धत मला सांग. हे कमलनयन श्यामसुंदरा! आपण शंकर इत्यादी जगदीश्वरांचेसुद्धा ईश्वर आहात आणि मी आपलाच प्रेमी भक्त आहे म्हणून कर्मबंधनातून मुक्त करणारा हा विधी आपण मला सांगावा. भगवंतांच्या कृपेचा महिमा अगाध आहे त्याबद्दलच उद्धव पुढे सांगत आहे. तो म्हणाला, तू कृपादृष्टीने पाहिलेस तरी पुरे, त्यामुळे कर्मबंधाच्या गाठी तत्काळ सुटतात आणि भक्तांना स्वानंदाची पुष्टि मिळते. ज्याप्रमाणे तुपाचा कठिणपणा सूर्याचे किरण एका क्षणात विरघळवून टाकतात, त्याप्रमाणे कृष्णा! तुझे कृपावलोकन कर्मबंधाचे निर्दालन करून सोडते किंवा मिठाचा केवढाही मोठा पर्वत असला तरी तो समुद्रात जसा विरून जातो, त्याप्रमाणे श्रीकृष्णा! तुझी कृपा ही कर्मबंधाला समूळ नष्ट करून टाकते. सूर्योदय झाल्यानंतर ज्याप्रमाणे काजवा दृष्टीस पडत नाही, त्याप्रमाणे तुझी कृपादृष्टी झाली की, कर्म अकर्माचा झाडा होऊन जातो. अंधारामध्ये कोट्यावधि काजवे चमकतात, त्याप्रमाणे अज्ञानामध्ये कर्माचे अवडंबर माजते. अज्ञानामुळे केलेल्या कर्मातून फळाची अपेक्षा निर्माण होते. तुझ्या कृपारूप सूर्याची जोड मिळाली, की कर्मे बिचारी विरूनच जातात. अशा निष्कर्म कृपेने युक्त होऊन तुझे भक्त नांदतात व ते विषयाविषयी अत्यंत विरक्त असून सदासर्वदा हरिचरणाच्या ठिकाणीच अनुरक्त असतात. ह्यास्तव तुझ्या पूर्ण कृपेची प्राप्ती होण्याच्या दृष्टीने तुझे पूजाविधान मला कृपा करून सांग. मी तुझे अत्यंत दीन लेकरू आहे. तू कदाचित म्हणशील की, तुला हा अधिकार नाही पण श्रीकृष्णा! मी तुला शरण आलो आहे. तू शरणागताची कधीही उपेक्षा करत नाहीस. याची कित्येक उदाहरणे देता येतील अगदी मनुष्यच काय, तू जटायु-संपाती-गजेंद्र इत्यादि पशुपक्ष्यादिकांचाही उद्धार केलेला आहेस. तू गणिकेला व वेश्येलाही तारले आहेस. हे कृपाळू हृषीकेशा ! तीच कृपा तू माझ्यावरही कर.
क्रमश:








