अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, आत्मा जेव्हा शुद्ध असतो तेव्हा त्याला विकारांची बाधा होत नाही. आत्मा हा सर्वदा हजर असतो. त्यामुळे त्याला जन्म मरण नाही. त्याला जन्म नसल्याने गर्भाचा आणि त्याचा कधीच संबंध येत नाही. त्याचा जन्म गर्भातून होत नसल्याने त्याला देहही नसतो. आत्म्याची कधी वाढही होत नाही आणि त्यात कधी घटही होत नाही. देहाची वाढ काळानुसार होत जाते.
जसजशी देहाची वाढ होत जाते तसतसे कर्म त्याच्या पाठी लागते. आत्म्याला देह नसल्याने तो कायम विदेही असतो. त्यामुळे त्याला कधीही कर्म करावे लागत नाही. तो कोणतेही कर्म करत नसल्याने साहजिकच त्याला कर्मातून येणारी बद्धता स्पर्शही करत नाही. जो निरावयव असतो. त्याच्यावर कोणताही संस्कार घडत नाही. तसेच निरावयव असल्याने त्याला कोणतेही विकार स्पर्श करत नाहीत. आत्मा हा नष्ट न होणाऱ्या परमात्म्याचा अंश असल्याने तो गर्भ आणि जन्माच्या पलीकडे असतो त्यामुळे त्याला मृत्यूही नसतो.
ज्याला जन्म, मरण आणि कर्म नसते त्याला विकारी कोण करणार? म्हणून आत्मवस्तू अविकारी आणि परिपूर्ण असते. निबिड अज्ञान दाटले असले तरी आत्मा नाही असे होत नाही तसेच प्रखर ज्ञान प्रकटले तरी आत्म्याचा नव्याने उदय झाला असेही होत नाही कारण ज्ञान आणि अज्ञान ह्यापासून आत्मा अलिप्त असतो. डोळ्यांनी समोरचं दृश्य दिसते परंतु अंधार दाटला असेल तर ते दिसत नाही.
जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा अंधार नाहीसा होतो व पुन्हा डोळ्यांना समोरचे दृश्य दिसू लागते म्हणजेच दृश्य आहे तसेच असते परंतु अंधारामुळे ते दिसत नसते. त्याप्रमाणे अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा अतिरेक झाला की, आत्मा नाही असे वाटू लागते आणि द्वैताचा मिथ्या भास होऊ लागतो. त्यावर शुद्ध ज्ञानाचा उतारा मिळाला की, अविद्येचा मळ निघून जातो. असं जरी असलं तरी, ज्ञानामध्ये नवीन आत्म्याची निर्मिती करायची शक्ती
नसते.
आत्मा मात्र स्वत:च्या प्रकाशाने ज्ञान आणि अज्ञानावर उजेड पाडू शकतो. ज्ञान, अज्ञान हे विकार अविद्येमुळे निर्माण होतात पण आत्मा अविद्येच्या पलीकडे असल्याने तो नित्य निर्विकार असतो. ज्याला उजेड अंधार माहीत आहे त्याला त्यातील फरक समजतो. पण सूर्य उजेड अंधाराच्या पलीकडे असतो त्याप्रमाणे आत्मा ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे असतो. त्यामुळे त्याला ज्ञान आणि अज्ञान स्पर्शही करू शकत नाहीत.
आत्मा निर्विकार, स्वयंज्योति असल्याने ज्ञान अज्ञानापासून अलिप्त असतो. आत्मा परिपूर्ण असल्याने त्याला वेगळे असे मातापिता नसतात. त्यामुळे आत्म्याला जन्मकथा नसते. त्रिगुणांचे त्रिविध मळ हे समूळ मिथ्या मायिक असल्याने त्यांचा निर्मळ अशा ईश्वराचा अंश असलेल्या आत्म्यावर थोडासा सुद्धा परिणाम होत नाही. मुळातच ईश्वर कसा आहे ते सांगता येत नाही. त्याला अमुक तमुक, असा तसा याप्रमाणे कोणतंही प्रमाण नाही. तो काळा, गोरा, सांवळा, निळा, धवल, पिवळा, जवळचा, दूरचा अशा कोणत्याही प्रमाणात सांगता येत नाही कारण तो ह्या प्रमाणांपेक्षा वेगळाच आहे. तेथे देश काळ वर्तमान ध्येय ध्याता अथवा ध्यान, ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान ह्यापैकी कोणतीही त्रिपुटी लागू पडत नाही. नाम-रूप-जात-गोत्र, क्रियाकर्म ह्यासगळ्यापासून अलिप्त असल्याने त्याला जन्ममरण कुठून असणार? तो सदोदित स्वानंदात मग्न असतो.
ईश्वराच्या ठिकाणी वृद्धी आणि ऱ्हास आदि, मध्य, अंत ह्यांना प्रवेशही नसतो. या रीतीने धर्म आणि अधर्म, सकळ भूतांचे क्रियाकर्म ह्यापासून परम परमात्मा अलिप्त असतो. परमात्मा ज्ञान अज्ञानापासून अलिप्त असतो. जेथे ज्ञानअज्ञानाचा अभाव असतो तेथे कर्माकर्म कुठून येणार? परमात्मा हा कोणताही भेद न मानता स्वानंदात रममाण असतो.
क्रमश:








