अध्याय बाविसावा
प्रकृती आणि पुरुष यातील फरक भगवंत उद्धवाला समजाऊन सांगत आहेत. ते म्हणाले, अहंकार प्रकृतीच्या किल्ल्याचा किल्लेदार असतो. तो मोठा भयंकर असून, निरनिराळय़ा विकारांची सामुग्री किल्ल्यात बाळगून असतो. माझ्या मायेच्या तीनही गुणांना त्याने स्वतःच्या ताब्यात ठेवलेले आहे. त्या देहरूपी किल्ल्याला तीन मार्ग असतात. त्यांपैकी दोन आडमार्ग असून एक मार्ग मात्र सरळ आहे. त्या मार्गामध्ये, जागोजागी युद्धाकरिता सैन्य उभे केलेले असते आणि मार्ग चारी बाजूंनी रोखलेले असतात.
अभिमान चोरद्वारातून पहात असतो आणि कामक्रोधाची खिडकी हळूच उघडून एकाएकी शत्रूवर घाला घालतो. लोभरूप तोफखाना सुरू होऊन धाड धाड आवाज होत असतात. त्यामुळे चोहोकडे अज्ञानाचा धूरच माजून राहतो. महामोहाने दिशा धुंद होऊन मागचे पुढचे काहीच दिसत नाही. या किल्ल्याच्या सभोवार तोफा तयार असतात आणि त्यातून विषयांचा सारखा भडिमार होत असतो. देहाभिमानाचा मुख्य चालक म्हणजे मन. त्याचा मारा महाभयंकर असल्याने, ते कशानेच मागे न हटता सर्व किल्ल्याचा बंदोबस्त आपल्या ताब्यात ठेवते. मन हे जातीनिशी हा देहरूप किल्ला राखून असते. त्याचे अंतर्बाह्य संरक्षण करण्यासाठी स्वतःच घरटी बांधते. निरनिराळय़ा प्रकारच्या इच्छा मनात धरून, मन शुन्यामध्ये मुसंडी मारते आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करणाऱयांना लोळवून संपवून टाकते.
मनाचा मारा अनिवार व फार कठीण आहे. त्याने त्रिविध तापाने लोकांना जर्जर करून हाय हाय करावयास लावले आहे. त्रिविध ताप कोणते म्हणशील तर देवांपासून जो ताप होतो तो अधिदैविक, मनापासून जो ताप होतो तो आध्यात्मिक, आणि पंचमहाभूतांपासून जो ताप होतो तो भौतिक असे तापाचे तीन प्रकार होत. प्रकृतीचे आठ विभाग असतात. मन, बुद्धी, अहंकार आणि पंचमहाभूते हे ते विभाग होत. त्यापैकी मन अहंकाराला खतपाणी घालत असते तर पंचमहाभूते त्रिगुणांना हाताशी धरून कार्य करत असतात. ती सत्त्वगुणाने अंतःकरण, रजोगुणाने इंद्रिये व तमोगुणाने विषयभाव प्रसवतात हे लक्षात ठेव. या तीन गुणांपासून दुसरे निरनिराळे विकार उत्पन्न होतात, ते ही प्रकृतीचाच भाग होत. अशी प्रकृतीच्या किल्ल्यावरील तयारी जय्यत असते. त्यामुळेच हा प्रपंच फार फोफावला आहे. निरनिराळय़ा संकल्पांचा येथे पाऊस पडत असतो आणि मन तेच पाणी पिऊन संसाराच्या सुखदुःखांत विहार करत असते. प्रकृतीने शरीराचा आकार धारण केलेला असून या शरीररूपी किल्ल्याला दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुडय़ा, तोंड, गुद आणि उपस्थ अशी नऊ दारे असतात. किल्ल्यांतील सर्व नऊ दारांमध्ये अधिदैव, अधिभूत व अध्यात्म कोणते तेही सांगतो. डोळा अध्यात्म आहे, त्याचा विषय रूप हे अधिभूत आहे आणि डोळय़ांमध्ये असलेला अधिदैव अंश सूर्य आहे. जोपर्यंत या सूर्याचा प्रकाश आत्मज्ञानाच्या माध्यमातून ग्रहण करता येत नाही, तोपर्यंत नजरेसमोर अंधारच असतो. येथे जे आपल्या दृश्याचे दर्शन होते, त्यामुळे देह हाच काय तो मी, ही देहबुद्धी दृढतर होऊन बसते. अध्यात्म आणि अधिदैव ही दोन्ही असून जेव्हा गुरूची परिपूर्ण कृपा होते आणि अधिभूताचे दृश्य दर्शन बंद होते, त्याचवेळी खरोखर ब्रह्मज्ञान प्राप्त होते. ते दृश्याचेच भान नाहीसे केले, म्हणजे देहासहवर्तमान संसारच शून्य वाटू लागतो. याप्रमाणे त्वचा, कान, जीभ, नाक आणि चित्त इत्यादींचेसुद्धा तीनतीन भेद आहेत. यावरून एक लक्षात येते की, परमात्मा हा आद्य, अव्यक्त व अतक्मर्य असून प्रकृतीहून भिन्न आहे. ह्याला जाणावयाला आत्मज्ञानाचाच आधार घेणं आवश्यक आहे. ह्याला ह्याच्याच सामर्थ्याने हृदयात पहावे, ह्याच्याच योगाने ह्याला परिपूर्णत्वाने ओळखावे, ह्यालाच हाताशी घेऊन ह्याला पावावे, आणि तेसुद्धा याच्याच कृपेने प्राप्त होते. हा स्वयमेवच स्वप्रकाशित आहे. ह्याला प्रकाशित करील असे दुसरे कोणी नाही. ह्याच्याच प्रकाशाने ह्याला पहावे आणि ह्याच्याच योगाने ह्याच्या स्वरूपांत मिळून जावे.
क्रमशः








