अलतगा यात्रा तोंडावर, शेळ्या-मेंढ्यांना मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
यात्रा-जत्रांना प्रारंभ झाल्याने बकरीमंडई येथील बकरी बाजार बहरू लागला आहे. लम्पी आणि इतर कारणांमुळे बकरी बाजार अडचणीत आला होता. मात्र आता पुन्हा यात्रा-जत्रांमुळे पूर्ववत होऊ लागला आहे. विशेषत: अलतगा येथील महालक्ष्मी यात्रेला येत्या 24 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. त्यामुळे बकऱ्यांची खरेदी-विक्री वाढली आहे.
शनिवारी बकरीमंडईत शेळ्या, मेंढ्या आणि लहान शेळ्यादेखील विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. अलतगा यात्रेमुळे शेळ्या-मेंढ्यांची खरेदी विक्री वाढली होती. त्यामुळे उलाढाल वाढली होती. लम्पीमुळे पाच-सहा महिने जनावरांचा आणि बकरी बाजार बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे व्यापारी, विक्रेते आणि दलाल अडचणीत आले होते. मागील काही दिवसांपासून बकरी बाजार पूर्ववत सुरू झाला आहे. मात्र आता यात्रा-जत्रा तोंडावर आल्याने बाजाराला बहर येऊ लागला आहे.
बकरीमंडईत साधारण 5 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत बकऱ्यांची विक्री झाली. मेंढ्यांच्या तुलनेत शेळ्यांची संख्या अधिक प्रमाणात होती. शिवाय पालव्यांना अधिक पसंती दिली जात होती. यात्रा जवळ आल्याने पै-पाहुणे आणि ग्रामीण भागातून शेळ्या-मेंढ्या खरेदी केल्या जात होत्या. विशेषत: अलतगा यात्रेसाठी जय्यत तयारी सुरू झाली असून, शेळ्या-मेंढ्या खरेदीला वेग आला आहे. मेंढ्या मिळत नसल्याने ग्राहकांना शेळ्या आणि पालवे खरेदी करावे लागत आहेत. दरम्यान मेंढ्यांचे दरदेखील वाढले आहेत. त्या तुलनेत शेळ्यांचे दर आवाक्यात आहेत.









