भाविकांमध्ये अफवा पसरवल्याने बकरी बळी देण्याचा प्रयत्न
वार्ताहर/उचगाव
उचगावच्या तमाम जनतेचे जागृत देवस्थान मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये 31 मे 2024 पासून पूर्णत:पशुहत्या आणि यात्रेवर कर्नाटक पशुहत्या कायद्यानुसार आणि ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी, पोलीस खाते यांच्या आदेशानुसार निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र काही भाविकांना चुकीची माहिती पुरविल्याने मंगळवार दि. 1 एप्रिल रोजी दहा ते बारा बकरी देवीला बळी देण्यासाठी आमराईत घेऊन आले असताना ती ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी जप्त केली. देवीच्या आमराईमध्ये पशुहत्या करण्यावर पूर्णपणे निर्बंध लावण्यात आले आहेत. तेव्हा इथून पुढे कोणीही या देवीच्या आमराईत पशुहत्या करण्यासाठी बकरी घेऊन येत असतील तर त्यांची बकरी जप्त केली जातील आणि त्यांना दंड ठोठाविण्यात येईल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तरी मळेकरणी देवीची आमराईत कोणीही बकरी घेऊन येऊ नये, असा इशारा उचगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी दिला आहे.
सन 2024 पासून उचगाव येथील जागृत मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये पशुहत्येवर पूर्णत: निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र काही व्यक्तींकडून बकरी मारण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे, अशाप्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरविल्याने आणि भाविकांना याची माहिती नसल्याने मंगळवारी बेळगाव तालुक्यातील काही भाविक बकऱ्यांसह मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये सकाळी दाखल झाले होते. मात्र उचगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी प्रत्येक मंगळवार शुक्रवार या आमराईत बकरी घेऊन येणाऱ्यांवरती बारीक नजर ठेवून असल्याने तसेच पोलीस खात्यानेही कडक पहारा ठेवल्याने मंगळवारी आलेली बकरी जप्त करण्यात आली. आणि त्यांना बकरी आणण्यास मनाई असतानासुद्धा आपण बकरी घेऊन आल्याबद्दल चांगले सुनावण्यात आले. अखेर जप्त करून ती बकरी त्यांना पुन्हा परत करण्यात आली.
पुन्हा पशू बळी देण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांच्या हवाली करणार
मात्र इथून पुढे उचगावमध्ये कोणीही देवीच्या यात्रेसाठी बकरी घेऊन येऊ नये, यावरती पूर्णत: निर्बंध लावण्यात आले आहेत. जर असे कोणी केल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करून पोलिसांच्या हवाली करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. तसेच उचगावमधील मटण शॉपमधून कोणीही बाहेर गावातील नागरिकांनी येऊन बकरी मारून घेऊन जाऊ नये, असेही सर्वांना सुनावण्यात आले आहे.









