पाच मोटारसायकली जप्त
बेळगाव : शेळ्या व मेंढ्या चोरीच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले तिघेजण अट्टल मोटारसायकल चोर निघाले आहेत. मारिहाळ पोलिसांनी त्यांच्याजवळून पावणे दोन लाख रुपये किमतीच्या चोरीच्या पाच मोटारसायकली जप्त केल्या आहेत. साहील मोहम्मदअली बेटगेरी (वय 19) रा. श्रीनगर बेळगाव, गणेश शिवाप्पा कोळवी (वय 18) मूळचा रा. सुनकुंपी, ता. बैलहोंगल, सध्या रा. बसव कॉलनी, बॉक्साईट रोड, प्रज्ज्वल नागराज हिरेमणी (वय 20) मूळचा रा. लक्कलकट्टी, ता. गजेंद्रगड, जि. गदग, सध्या रा. तिसरे रेल्वेगेटजवळ बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाची नावे आहेत.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, उपनिरीक्षक मंजुनाथ नायक, चंद्रशेखर सी., बी. एन. बळगण्णावर, बी. बी. क•ाr, एच. एल. यरगुद्री, ए. एम. जमखंडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. दि. 6 नोव्हेंबर रोजी रात्री तुम्मरगुद्दी, ता. बेळगाव येथील एका घरासमोर बांधण्यात आलेली शेळी व मेंढा चोरण्यात आला होता. याप्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला. शेळी चोरी प्रकरणाच्या तपासासाठी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांनी मोटारसायकली चोरल्याचेही तपासात उघडकीस आले. चंदगड, बेळगाव येथील कॅम्प व काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दुचाकी चोरल्याची कबुली या त्रिकुटाने दिली असून पाच मोटारसायकलींबरोबरच त्यांच्याजवळून 9 हजार 500 रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.









