आमदार जीत आरोलकर यांचे प्रतिपादन : सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारिता पुरस्कार वितरण
सावंतवाडी ; गोव्याच्या सीमेवर तुये येथे येत्या महिनभरात बांबोळी-गोवाच्या धरतीवर सुसज्ज असे हॉस्पिटल, त्याचबरोबर पुढील सहा महिन्यात धारगळ येथे आयुषचे मोठे संशोधन केंद्र होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचा प्रश्न निश्चतच सुटेल. त्यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी आम्ही कायम सकारात्मक आहोत, असे आश्वासन गोव्याचे आमदार जीत आरोलकर यांनी रविवारी येथे केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे होते. यावेळी मुंबईचे माजी नगरसेवक शैलेश परब, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, ‘तऊण भारत’चे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, पत्रकार सागर चव्हाण, इडमिशनचे विनायक जाधव, ज्येष्ठ पत्रकार अवधूत पोईपकर, सचिन रेडकर, हरिश्चंद्र पवार, संतोष सावंत, अमोल टेमकर, प्रसन्न राणे, रामचंद्र कुडाळकर, मयुर चराटकर, आशुतोष भांगले आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार आरोलकर पुढे म्हणाले, आपण गोव्याचे आमदार असलो तरी सिंधुदुर्ग व गोव्याचे नातेसंबंध जोडलेले आहेत. आम्ही कायमच येथील लोकांना सहकार्य करतो. त्यामुळे कधीही हक्काने हाक मारा. मी निश्चितच मदत करेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले. गोवा बांबोळी येथे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना आता चांगली बातमी आहे. तुये येथे बांबोळी हॉस्पिटलच्या धरतीवर सुसज्ज असे हॉस्पिटल उभारले जात आहे. ते बांबोळी हॉस्पिटलशी जोडले जाणार आहे. त्यामुळे त्याच दर्जाची सेवा या ठिकाणी सुद्धा उपलब्ध होणार आहे. तसेच आणखी सहा महिन्यांनी धारगळ येथे आयुष संशोधन सेंद्र सुरू केले जाणार आहे. त्याठिकाणी गोवा कर्नाटक व महाराष्ट्र या तीन राज्यातील रुग्णांना रुग्णसेवा उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, भारतातील अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनवर नेण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा एक ट्रिलियनपर्यंत नेण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंगचे शिक्षण मराठी माध्यमातून देण्यात येणार आहे तर भविष्यात मेडिकलचे शिक्षणही मराठी माध्यमातून देण्यात येईल. या माध्यमातून शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ निर्माण होतील, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पुरस्कार विनायक गावस, माजी आमदार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार अभिमन्यू लोंढे, चंदू वाडीकर आदर्श समाज सेवक पुरस्कार लुमा जाधव, ‘जीवन गौरव’ पुरस्कार रमेश बोंद्रे, बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार ‘तरुण भारत’चे परशुराम मांजरेकर, छायाचित्रकार बंडोपंत भिसे पुरस्कार गणेश ऊर्फ बाळा हरमलकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पत्रकारितेत 25 वर्षांहून अधिक काम केलेल्या पत्रकारांचा खास सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मोंडकर व शुभम धुरी यांनी केले.









