राज्यपाल पिल्लई यांनी घेतला तयारीचा आढावा
पणजी : पुढील महिन्यात गोव्यात होऊ घातलेल्या जी-20 परिषदेच्या तयारीच्या आढाव्यासाठी काल सोमवारी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या अध्यक्षतेखाली राजभवनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. शिष्टाचार खात्याचे सचिव संजीत रॉड्रिग्स यांनी जी 20 परिषदेची सविस्तर माहिती राज्यपालांना दिली. जी – 20 चे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रींगला, एल रमेशबाबु, अशोककुमार शर्मा, अरविंद सिंग, केंद्रीय पर्यटन सचिव जसविंदर सिंग, जी – 20 चे संचालक राधा कट्याल नारंग, डी. व्यंकटेशन, आर. के. धवन तसेच धीरज वागळे इत्यादी बैठकीस उपस्थित होते. या परिषदेसाठी विविध कार्यक्रमांचे कसे आयोजन केलेले आहे आणि गोव्याच्या संस्कृतीचेही दर्शन कसे घडविले जाणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती राज्यपालांनी या बैठकीत दिली. गोव्याच्या संस्कृतीचीही माहिती त्यांनी शिष्टमंडळाला दिली. गोव्याच्या मूळ संस्कृती व परंपरेचा उल्लेख परिषदेच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या माहिती पुस्तिकेत करण्यात यावा अशी शिफारस राज्यपाल पिल्लाई यांनी केली आहे.
एप्रिलमध्ये परिषदेच्या बैठका
जी-20 शिखर परिषद गोव्यात 17 ते 19 एप्रिल या दरम्यान होणार असून, या तीन दिवसांत 8 बैठका होणार आहेत. परिषदेच्या शिखर बैठका मे, जून आणि जुलैमध्ये होणार आहेत. जूनची बैठक लांबणीवर पडणार असून 5 जून ते 23 जून या कालावधीत होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.









