श्रीलंकेत होणार स्पर्धा; राखीव खेळाडूंत झाली निवड; भारतीय संघात निवड होणारा गोव्याचा सहावा खेळाडू
क्रीडा प्रतिनिधी/ मडगांव
गोव्याचा रणजीपटू आणि अष्टपैलू क्रिकेटर मोहित रेडकर याची 23 वर्षाखालील आशिया करंडक एकदिवशीय क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय ‘अ’ क्रिकेट संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाली. गोव्याच्या मोहित रेडकर व अर्जुन तेंडुलकर यांची भारतीय 23 वर्षाखालील क्रिकेट संघ निवडीसाठी संभाव्य क्रिकेटपटू यादीत निवड झाली होती.
श्रीलंकेत या स्पर्धेचे आयोजन होणार असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेत भाग घेणारा आपला 19 सदस्यीय क्रिकेट संघ काल जाहीर केला. दिल्लीच्या यश धूल याच्याकडे संघाचे कप्तानपद देण्यात आले असून पंजाबचा अभिषेक शर्मा हा उपकप्तानपदी असेल.
भारतीय क्रिकेट संघात निवड झालेला नावेली- दिकरपाली येथील 22 वर्षीय मोहित रेडकर हा गोव्याचा सहावा क्रिकेटपटू आहे. गोव्यात मडगावी जन्मलेले दिलीप सरदेसाई यांनी मुंबईचे प्रतिनिधीत्व करताना भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविले होते. त्यानंतर सौरभ बांदेकर, राहुल केणी, अविनाश दाभोळकर, स्वप्नील अस्नोडकर आणि हेरंब परब यांनी भारतीय वयोगटातील क्रिकेट संघात स्थान मिळविले होते. मोहितला आता 23 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघात राखीव खेळाडूत स्थान मिळाले आहे.
मोहित रेडकरने गेल्या रणजी क्रिकेट हंगामात पदार्पण करताना आपलं लक्ष अष्टपैलू खेळीने वेधून घेतले होते. सात सामन्यांतून 19 विकेट्स तसेच राजस्थान आणि केरळ विरूद्ध दोन वेळा डावात 5 गडी बाद केले होते. याव्यतिरिक्त 238 धावाही कुटल्या होत्या.
आशियाई क्रिकेट
कॉन्फेडरेशनची श्रीलंकेत होणारी एकदिवशीय क्रिकेट स्पर्धा 13 ते 23 जुलै या कालावधीत होणार आहे. भारताचा यूएई, पाकिस्तान व नेपाळच्या गटात तर दुसऱ्या गटात अफगाणिस्तान, बांगलादेश, ओमान व श्रीलंका यांचा दुसऱ्या गटात समावेश आहे. 13 जुलै रोजी भारताचा पहिला सामना संयुक्त अरब अमिरातशी, 15 जुलै रोजी भारताचा मुकाबला पाकिस्तानशी तर 18 रोजी भारताची लढत नेपाळशी होईल. स्पर्धेतील उपान्त्य सामने 21 जुलै रोजी तर अंतिम लढत 23 रोजी खेळविण्यात येईल.
भारतीय 23 वर्षाखालील ‘अ’ क्रिकेट संघ याप्रमाणे :
यश धूल (कप्तान), अभिषेक शर्मा (उपकप्तान), निकीन जोस, प्रदोष रंजन पॉल, रियान पराग, निशांत सिंधू, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), मानव सुथार, युवराजसिंग दोडिया, हर्षीत राणा, आकाश सिंग, नितीशकुमार रे•ाr, राजवर्धन हंगरगेकर. राखीव- हर्ष दुबे, नेहाल वढेरा, स्नेल पटेल व मोहित रेडकर. सितांशू कोटक (मुख्य प्रशिक्षक), साईराज बहुतुले (गोलंदाजी प्रशिक्षक), मनीष बाली (फिल्डिंग कोच).









