मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा : विधानसभेत विनियोग विधेयक संमत, आमदारांना मतदारसंघाच्या विकासासाठी शंभर कोटी
पणजी : गोव्याचा सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे गणेश चतुर्थीची ‘माटोळी’ असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केला. अनेक वादग्रस्त प्रश्न सोडवण्यात सरकारने यश मिळवले. हे सरकार अंत्योदय, ग्रामोदय, सर्वोदय या तत्वावर चालते, असेही त्यांनी नमूद केले. तसेच स्वयंपूर्ण आणि विकसित गोव्यासाठी हा अर्थसंकल्प हातभार लावणारा असल्याचे ते म्हणाले. काल शुक्रवारी विधानसभेत विनियोग विधेयक संमत करताना डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मागील अर्थसंकल्पाचा कृती अहवाल सादर करण्यात आला आहे त्यातील 90 टक्क्यापेक्षा जास्त आश्वासने पूर्ण झाली आहेत. आता सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा कृती अहवाल देणार असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक आमदारास त्यांच्या मतदारसंघातील साधनसुविधा विकासासाठी रु. 100 कोटी देण्यात येणार आहेत. गोमंतकीय जनतेच्या प्रेमासाठी हे सरकार काम करते, असा दावा डॉ. सावंत यांनी केला.
112 डॉक्टर्स भरती करणार
केंद्र सरकारकडून कोट्यावधीचा निधी प्राप्त होण्याची आशा त्यांनी वर्तवली. आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात येणार असून 112 डॉक्टर्स घेण्यात येणार आहेत. ते कमतरता असलेल्या आरोग्य केंद्रात, इस्पितळात नेमण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
स्वयंरोजगार सुरु करावेत
गोव्याच्या स्वयंपूर्णतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून पंचायत पातळीवर ‘स्वयंपूर्ण मित्र’ मोठे काम करीत आहेत, असे त्यांनी नमूद केले. आर्थिक विकास महामंडळाकडून कर्जे घेऊन मुख्यमंत्री योजनेतून व्यवसाय सुरु करण्याचे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. सदर विनियोग विधेयकावर विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, विजय सरदेसाई, व्हेन्झी व्हिएगश, विरेश बोरकर यांची भाषणे झाली. आलेमांव यांनी सरकारवर जोरदार टीका केली.









