मडगाव : आगामी फुटबॉल हंगामासाठी एफसी गोवाने गोलरक्षक लारा शर्मा याला करारबद्ध केले आहे. बेंगलोर एफसीकडून कायमस्वरूपी हस्तांतरणानंतर त्याला करारबद्ध केल्याचे क्लबकडून काल जाहीर करण्यात आले. या करारामुळे 24 वर्षीय लारा हा आगामी 2024-25 हंगामासह पुढील अनेक वर्षे गौर्सचे प्रतिनिधीत्व करेल.लारा शर्मा हा प्रतिष्ठित टाटा फुटबॉल अकादमीमध्ये तयार झाला आहे. त्याने 2017 मध्ये इंडियन ऑरेंजमधून त्याच्या प्रोफेशनल फुटबॉलची सुरूवात केली. नंतर 2020 मध्ये बेंगलोर एफसीमध्ये सामील होण्यापूर्वी तो एटीके एफसीच्या रिझर्व्ह संघाकडून खेळला.
2021-22 हंगामाच्या सुरूवातीला ब्लूज रिझर्व्हने ड्युरँड कप स्पर्धेत भाग घेतला, तेव्हा तो पहिल्या पसंतीचा गोलकीपर होता. टीमच्या उपांत्य फेरीपर्यंतच्या वाटचालीत त्याने महत्वाची भूमिका बजावली. मात्र अंतिम फेरीत त्यांना एफसी गोवाकडून पॅनल्टीवर मात खावी लागली. अगदी अलीकडे, गोलरक्षक लारा केरळ ब्लास्टर्सवर ऑन लोनवर होता. जिथे त्याने 2023-24 हंगामात त्यांच्या लीग मोहिमेच्या समाप्तीपर्यंत त्यांचे प्ले-ऑफ स्थान सुरक्षित करण्यात चांगली भूमिका बजावली. ‘एफसी गोवात लाराचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.तो अनेक उत्कृष्ट गुणांसह एक आशादायक युवा गोलरक्षक आहे आणि येत्या काही वर्षांत भारताच्या सर्वोच्च गोलरक्षकांपैकी तो एक असेल, असे एफसी गोवाचे प्रशिक्षक मॅनोला मार्केझ म्हणाले.









