वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेचे क्रेग फुल्टन यांनी भारतीय पुऊष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या नवीन भूमिकेला सुरुवात करून जेमतेम दोन आठवडे उलटले आहेत. मात्र त्यांच्यासमोर ध्येय अगदी स्पष्ट असून त्यात भारतीय हॉकी संघाला आशियात अग्रक्रमांकावर पोहोचविणे आणि पुढील वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र मिळविणे यांचा समावेश आहे.
2018 पासून बेल्जियम हॉकीच्या उदयाचे साक्षीदार राहिलेल्या फुल्टन यांची भारताने प्रथम आशियाई हॉकीवर वर्चस्व गाजवावे आणि नंतर हळूहळू जागतिक स्तरावर त्याचे रूपांतर करावे अशी इच्छा आहे. माझ्या मनात भारताला आशियातील पहिल्या क्रमांकाचा संघ बनविण्याचे ध्येय आहे. निश्चितपणे हे उद्दिष्ट आम्ही साध्य करू इच्छितो आणि तेथे सातत्याने राहू इच्छितो. त्यानंतर पुढे जाणे आवश्यक आहे. कारण जर आपण जागतिक क्रमवारीत चौथ्या वा पाचव्या स्थानावर असाल, तर अग्रस्थानावर पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे ’फुल्टन आपल्या प्रसिद्धीमाध्यमांकडील पहिल्या संवादात म्हणाले. हा संवाद व्हर्च्युअल पद्धतीने झाला.
जेव्हा तुमच्याकडे पुरेसा अनुभव असतो आणि सर्व खेळाडूंना अनुकूल असा गेम प्लॅन असतो तेव्हा तुम्ही निश्चितपणे प्रयत्न करून अंतिम फेरीत थडकू शकता आणि तेथे जिंकूही शकता. आशियाई खेळांद्वारे पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र होणे हे आमचे प्रथम प्राधान्य आहे. एफआयएच प्रो लीग, स्पेनमधील चार देशांची स्पर्धा आणि त्यानंतर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा वापर करून आम्हाला खरोखरच मजबूत बनायचे आहे आणि ऑलिम्पिकसाठी सरळ पात्र होण्याच्या दृष्टीने भक्कम स्थितीत राहायचे आहे, असे फुल्टन यांनी सांगितले.
फुल्टन यांनी प्रशिक्षक म्हणून मागील कार्यकाळात चांगले यश मिळविले आहे. 2014 ते 2018 या कालावधीत आयरिश पुऊष संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याच्या कीर्तीचा त्यांचा उदय झाला. 100 वर्षांत त्यांनी प्रथमच आयरिश संघाला ऑलिम्पिकसाठी पात्र ठरवून दाखविले. या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्यांना 2015 मध्ये ‘एफआयएच कोच ऑफ द इयर’ पुरस्कारही मिळाला.









