दिल्ली विद्यापीठ शताब्दी सोहळ्यात संबोधन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमाला संबोधित केले आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी 2047 पर्यंत भारताला विकसित देशाचा दर्जा मिळवून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे उद्गार काढले आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी दिल्ली मेट्रोतून प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी सर्वसामान्यांशी संवाद साधला आहे.
कुठल्याही देशाच्या कामगिरीचे प्रतीक हे त्याची विद्यापीठे, शैक्षणिक संस्थाच असतात. दिल्ली विद्यापीठ केवळ एक विद्यापीठ नसून एक चळवळ आहे. या विद्यापीठाने प्रत्येक चळवळीत योगदान दिले असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र करण्याचा आमचा संकल्प आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना जगात आमच्या देशाचा सन्मान वेगाने वाढत असल्याची जाणीव झाली. भारत सध्या जगातील 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणारा देश आहे. देशाच्या लिंग गुणोत्तरात मोठी सुधारणा झाली असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
मागील शतकाच्या तिसऱ्या दशकाने स्वातंत्र्ययुद्धाला नवा वेग दिला होता. आता या शतकातील तिसरे दशक भारताच्या विकासयात्रेला नवा वेग प्रदान करणार आहे. देशभरात आता मोठ्या संख्येत विद्यापीठे अन् महाविद्यालयांची स्थापना होत आहे. आमच्या शैक्षणिक संस्था जगभरात एक वेगळी ओळख निर्माण करत आहेत. एकेकाळी कुठल्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थी केवळ प्लेसमेंटला प्राथमिकता देत होते. परंतु आता तरुण-तरुणी जीवनात काहीतरी नवे करू इच्छितात असे वक्तव्य मोदींनी केले आहे.









