दोघा बंधुनी मिळवून दिले सुवर्ण व रौप्य-सुवर्णपदक माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना समर्पित
फोंडा : 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तायक्वांदो खेळात गोव्याला दोघा बंधुनी सुवर्ण व रौप्यपदक मिळवून दिले. पुरुषांच्या 87 कि. ग्रॅ. वरील गटात पी. आनंदने सुवर्ण तर त्याचा छोटा भाऊ पी. सर्वानाकुमार याने रौप्यपदक पटकावून चमकदार कामगिरी केली तर महिला गटात गोव्याच्या रोदाली बारुआने सुवर्णपदक पटकावले. फोंडा येथील क्रीडा प्रकल्पच्या इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या स्पर्धेचा काल शुक्रवारी शेवटचा दिवस होता. 87 कि. ग्रॅ. वरील गटात पी. आनंदने सुवर्ण, कर्नाटकच्या प्रित कुमारने रौप्य तर बिहारच्या विवेक प्रकाश व हरियाणाच्या जसवंतने कांस्यपदक प्राप्त केले. 80 कि. ग्रॅ. खालील गटात दिल्लीच्या शिवंश त्यागीने सुवर्ण, गोव्याच्या पी. सर्वानाकुमारने रौप्य तर राजस्थानच्या अभिजित बल्या व केरळच्या वासीन महंमदने कांस्यपदक मिळविले. 63 कि. ग्रॅ. खालील गटात हरियाणाच्या अजयकुमारने सुवर्ण, उत्तराखंडच्या नितेश सिंगने रौप्य तर गुजरातच्या श्रीराम दळवी व दिल्लीच्या दिपांशू याने कांस्यपदक प्राप्त केले. महिलांच्या 73 कि. ग्रॅ. वरील गटात गोव्याच्या रोदाली बारुआने सुवर्ण, कर्नाटकच्या प्रवालिकाने रौप्य तर महाराष्ट्रच्या नम्रता तायडे व ओडिशाच्या जान्हवी मझुमदार यांनी कांस्यपदक प्राप्त केले. 63 कि. ग्रॅ. खालील गटात केरळच्या मार्गारेट रेगीने सुवर्ण, जम्मू काश्मिरच्या आफ्रिन हैदरने रौप्य तर आंध्रप्रदेशच्या कोल्लीपुरी महालक्ष्मी व मध्यप्रदेशच्या मधू सिंग यांनी कांस्यपदक मिळविले. 53 कि. ग्रॅ. खालील गटात दिल्लीच्या अनिशा अस्वालने सुवर्ण, चंदिगडच्या रक्षा चहरने रौप्य तर महाराष्ट्रच्या निशिता कोतवाल व कर्नाटकच्या आदिती क्षात्रतेज यांनी कांस्यपदक पटकावले.
सुवर्णपदक माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना समर्पित
गोव्यासाठी सुवर्णपदक पटकावलेल्या पी. आनंदने हे पदक माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना समर्पित केले असल्याचे सांगितले. 2017 साली पी. आनंदला स्व. दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यावेळी स्व. मनोहर पर्रीकर यांनी त्यांना शाबासकी दिली होती. यावेळी गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपण गोव्याला सुवर्णपदक निश्चितच मिळवून देईन असे त्यांना सांगितले होते. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, प्रशिक्षक सुनिल शर्मा व इतर प्रशिक्षक व हितचिंतकांना दिले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्याचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. त्यांने 2011 साली झारखंड येथे व 2015 साली केरळ येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय त्याने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदके मिळविली आहेत. राज्यासाठी पदके मिळवून लौकीक प्राप्त केलेल्या खेळाडूंची शासनाने दखल घ्यावी असेही त्याने यावेळी सांगितले.









