कोडार येथे कृषी केंद्राच्या स्थापनेसाठी इस्त्रायलशी सहकार्य
पणजी : गोवा सरकारने इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय कृषी फार्म कोडार येथे कृषी केंद्राची स्थापना करण्यासाठी इस्रायलशी समन्वय करार केला आहे. इस्रायल दूतावास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजीपाला आणि फळांसाठी कोडार येथे केंद्राची पायाभरणी करण्यात आली. गोव्यासाठी योग्य असलेल्या भाजीपाला आणि फुलांच्या सुधारित जातींच्या रोगमुक्त आणि निरोगी भाजीपाल्याची रोपे तयार करण्यासाठी स्वयंचलित सिंचन आणि फलन प्रणालीद्वारे प्रगत उत्पादन तंत्रज्ञानासह हाय-टेक रोपवाटिका व्यवस्थापन प्रणालीच्या प्रात्यक्षिकावर या केंद्राचा भर राहणार आहे. दर्जेदार उत्पादनाच्या काढणीपूर्व आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम या केंद्राचे राहणार आहे. ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ ही कुशल कामगारांची एक टीम आहे. ती या कृषी केंद्रासाठी काम करणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील स्थानिक परिस्थितीनुसार प्रोटोकोल किंवा मार्गदर्शक तत्त्वे विकसित करणार आहे.








