मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली भावना. मुख्यमंत्री, पुरातत्व खात्याच्या मंत्र्यांकडून सप्तकोटेश्वरला जलाभिषेक
डिचोली. /प्रतिनिधी
हिंदू धर्मियांच्या धार्मिकता व आध्यात्मिक भावनेची कदर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी धार्मिक स्थळे व मंदिरे यांचा केलेला जीर्णोद्धार व पुनर्बांधणी यामुळेच धर्मांतरण रोखण्याचा हेतू साध्य होऊ शकला. नार्वेतील सप्तकोटेश्वर मंदिराचा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:च्या हस्ते जिर्णोद्धार करून राज्यातील धार्मिकता अबाधित राखताना धर्मांतरण रोखण्यासाठी उचललेले पहिले पाऊल होते. गोवा राज्याची संस्कृती राखताना पोर्तुगिजांचे हिंदूंवरील अत्याचार थोपविण्याचे कार्य महाराजांनी केले असून ते योगदान गोवा राज्य कदापि विसरणार नाही, अशी भावना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नार्वे येथे व्यक्त केली.
नार्वेतील सप्तकोटेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धारानंतर 355 वर्षांनी या मंदिराची पुनर्बांधणी व नूतनीकरण राज्य पुरातत्व खात्यातर्फे करण्यात आले आहे. या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्dयानिमित्त मंदिरात तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. याच धार्मिक विधीतील एक भाग म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सपत्नीक श्री देव सप्तकोटेश्वर यांच्या पिंडीकेवर स्वहस्ते जलाभिषेक केला. यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, नार्वेचे सरपंच संदेश पार्सेकर, पंचसदस्य तुकाराम गावडे व इतरांची उपस्थिती होती.
पुरातन मंदिरे उभारण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरविणार
गोव्यातील पुरातन मंदिरे ही या राज्याची सांस्कृतिक व पारंपरिक ठेव होती. त्यांचा संपूर्ण ऐतिहासिक तपशील सरकारकडे नोंद आहे. तो आम्ही लवकरच विधानसभेच्या पटलावर ठेवणार आहोत. तसेच राज्यातील जनतेलाही आम्ही अशी पुरातन मंदिरांचे अवशेष व नोंद असल्यास सरकारदरबारी सादर करण्याचे आवाहन केले होते. याकामी नियुक्त करण्यात आलेल्या चार सदस्यीय समितीचा अहवाल हाती आल्यानंतर कायदेशीर बाबी तपासून ही ऐतिहासिक पुरातन मंदिरे जी पोर्तुगीज राजवटीत किंवा अन्य राजवटीत नेस्तनाबूत करण्यात आली होती, त्यांचा जीर्णोद्धार व पुनर्निर्माण करण्याचे काम सरकार प्रत्यक्षात आणणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.









