भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केलेला विश्वास : आता पूर्णपणे सर्वेच्च न्यायालयावर अवलंबून
वार्ताहर / केपे
म्हादईच्या बाबतीत आम्ही पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून आहोत व आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, गोव्याच्या बाजूने योग्य निर्णय लागणार, असे उद्गार भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी काढले. ते कुडचडे येथील रवींद्र भवनात आयोजित करण्यात आलेल्या दक्षिण गोवा जिल्हा समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, आमदार दाजी साळकर, माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, सर्वानंद भगत, तुळशीदास नाईक व इतर हजर होते.
पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आता दोन्ही जिल्हा समित्यांची बैठक होत असून गुरुवारी दक्षिण जिल्हय़ातील 20 मतदारसंघांच्या समितीची व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यात केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व राज्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेली विकासकामे व इतर कामांबद्दल त्यांचे अभिनंदन करणारे ठराव घेण्यात आले, अशी माहिती तानावडे यांनी दिली. तसेच येणाऱया लोकसभा निवडणुकीची तयारी अत्यंत महत्त्वाची असून त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. विविध समित्या, निवडणुकीची आखणी यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाल्याचे तानावडे यांनी सागितले.
दक्षिण गोव्यातील 20 ही मतदारसंघांची ही बैठक होती. यापैकी अनेक मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. मात स्थानिक आमदार व मंत्री नीलेश काब्राल, वास्कोचे आमदार दाजी साळकर हेच तेवढे उपस्थित राहिले. सांगेचे आमदार व समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो हे मुख्यमंत्र्यांसोबत पत्रकार परिषद असल्याने उपस्थित राहू शकले नाही. त्याचबरोबर दक्षिणेतील इतर मंत्री, आमदार आणि खास करून काँग्रेसमधून भाजपात गेलेले आमदार यावेळी उपस्थित नव्हते.
यासंदर्भात तानावडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, राज्य कार्यकारिणी बैठकीस आमदारांनी उपस्थित राहणे अपेक्षित असते. पण ही जिल्हा समितीची बैठक आहे. यापूर्वी दक्षिण गोव्याची बैठक मडगाव येथे होत होती. यावेळी ती कुडचडे येथे घेण्यात आली आहे. कुडचडेचे आमदार हे यजमान असून ते उपस्थित आहेत. आमदार दाजी साळकर हे आपले विषय मांडण्यासाठी आले होते, असे तानावडे यांनी स्पष्ट केले. यावेळी दक्षिण गोव्यातील 20 मतदारसंघांतील समित्यांचे पदाधिकारी, भाजपाशी संबंधित नगराध्यक्ष, सरपंच, पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.









