मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : इफ्फीचे रंगारंग कार्यक्रमांद्वारे उद्घाटन. 79 देशांतील 280 चित्रपट

जय नाईक /पणजी
चित्रपट उद्योगासाठी गोव्यात सर्वतोपरी पोषक वातावरण असून चित्रिकरणापासून निर्मिती ते वितरणापर्यंतच्या सर्व प्रक्रियांसाठी गोव्यात जागतिक दर्जाचे हब विकसित करण्याचे सरकारचे ध्येय आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असून त्याचाच भाग म्हणून पाच हजार प्रेक्षक क्षमतेचे आंतरराष्ट्रीय परिषदगृह उभारण्यात येत आहे. 2025 पर्यंत ते पूर्ण होईल. त्यानंतर इफ्फीसाठी ते नवीन ठिकाण असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.

ताळगाव येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन, राज्यपाल श्रीधरन पिल्लई, यांच्यासह अभिनेते अजय देवगण, सुनील शेट्टी, प्रभू देवा, परेश रावल, विजयेंद्र प्रसाद, वरुण धवन, कॅथरीन तेरेसा, सारा अली खान, कार्तिक आर्यन, अमृता खानविलकर, मनोज वाजपेयी, प्रसून जोशी, वाणी त्रिपाठी, श्रेया शरण, पंकज प्रसाद, तसेच फ्रान्स व स्पेन या देशांचे राजदूत गोव्यातील सर्व मंत्री, आमदार, भाजप पदाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास तीन हजारांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.
2025 पासून इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर इफ्फीचे केंद्र
दोनापावला येथे उभारण्यात येणारे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर बांधा वापरा परत करा (बूट) तत्वावर बांधणार आहे. इफ्फीसाठी गोवा कायमस्वरुपी केंद्र बनल्यापासून गोव्यात चित्रपट उद्योग विकसित होत आहे. त्यासाठी लागणाऱया पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्यासंबंधी सरकार लवकरच एक सर्वसमावेशक धोरण राबविणार आहे. त्यानंतर चित्रपट निर्मितीशी संबंधितांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध होतील. यातील काही प्रकल्पात चित्रपट निर्मात्यांनाही गुंतवणूक करता येईल. चित्रपट चित्रीकरणासाठी गोवा हे आदर्श ठिकाण असून त्यासाठी येथे येणाऱयांना सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.
ओटीटी सारख्या प्लॅटफॉर्मचा स्वीकार महत्वाचा : ठाकूर
मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या भाषणादरम्यान, कोविड महामारी हा आव्हानात्मक काळ असतानाही क्रीडा आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत भारताने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याचबरोबर गोव्यानेही या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, असे सांगितले. ओटीटी सारख्या नवीन प्लॅटफॉर्मचा स्वीकार करणे आणि त्यांना महोत्सवाचा सर्वसमावेशक भाग बनवणे हे आमचे ध्येय आहे, असे ते पुढे म्हणाले. यापुढील इफ्फी अधिक दर्जेदार बनावा यासाठी लोकांनी सूचना पाठवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
कार्लोस सौरा यांना जीवनगौरव, चिरंजीवी ’इंडियन पर्सनालिटी’
स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांची कन्या ऍना सौरा रामॉन हिने सदर पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी स्पेनमधून बोलताना कार्लोस सौरा यांनी इफ्फी आयोजकांचे आभार मानले. अभिनेता चिरंजीवीला ’इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभिनेता मनोज वाजपेयी, सुनील शेट्टी, अजय देवगण, परेश रावल आणि आरआरआर व बाहुबली चित्रपटांचे कथाकार व्ही विजयेंद्र प्रसाद यांचा चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ज्युरींचाही सन्मान करण्यात आला.
अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. त्यानंतर डोळ्यांचे पारणे फेडणारा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. केंद्रीय सचिव अपूर्व चंद्र यांनी स्वागत केले. अपारशक्ती आणि कार्तिक आर्यन यांनी लाघवी सुत्रसंचालन केले.
महोत्सवात 79 देशांतील 280 चित्रपट
’गेल्या 100 वर्षांत भारतीय चित्रपटाची उत्क्रांती’ या संकल्पनेवर आधारित यंदाच्या या नऊ दिवसांच्या महोत्सवात 79 देशांतील 280 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. ऑस्ट्रियन चित्रपट ’अल्मा आणि ऑस्कर’ ने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. दि. 28 नोव्हेंबर रोजी ’परफेक्ट नंबर’ चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होणार आहे.









