काणकोणातील अपघातप्रवण क्षेत्रातील आठवा भीषण अपघात : हणकोण सातेरी जत्रोत्सवातून परत येताना काळाचा घाला : काणकोणच्या बगलमार्गावर दोन कारमध्ये अपघातात 3 ठार, 5 जखमी,कोठंबी – केपे येथे स्कूल बस – दुचाकी अपघातात दुचाकीचालक ठार

प्रतिनिधी – वार्ताहर /काणकोण – केपे
दक्षिण गोव्यात काणकोण तालुक्यातील बगलमार्गावर आणि कोठंबी-केपे येथे बुधवारी झालेल्या दोन वेगवेगळय़ा अपघातांत 4 जणांना मृत्यू आलेला असून 5 जण जखमी झालेले आहेत. त्यापैकी कारवारहून मडगावच्या दिशेने येणारी कार आणि कारवारच्या दिशेने जाणारी अन्य एक कार यांच्यात काणकोणातील मनोहर पर्रीकर बगलमार्गावर बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन व्यक्ती ठार झाल्या. मयतांमध्ये वीणा उल्हास नागेकर (60 वर्षे) आणि उल्हास राम नागेकर (64 वर्षे) या ज्येष्ठ दांपत्याचा आणि त्यांचा पुत्र हरिश उल्हास नागेकर (35 वर्षे) यांचा समावेश असून ते वास्को येथील निवासी आहेत. कोठंबी-केपे स्कूल बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक जेसवर्ड मार्टिन्स (वय 18 वर्षे) या युवकाचा मृत्यू झाला.

मडगावच्या दिशेने येणाऱया कारमध्ये दोन मुलांचाही समावेश होता. एकूण 5 जण जखमी झाले असून त्यात या मुलांचा समावेश आहे. या साऱयांना उपचारासाठी काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेले आहे.
काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 6.30 च्या सुमारास राजबाग, आंबेनास या ठिकाणी हा अपघात घडला. सायवी हरिश नागेकर (2 वर्षे), हर्षिता हरिश नागेकर (26 वर्षे), समीक्षा नागेकर (40 वर्षे), सुक्षता काणकोणकर (31 वर्षे) व साई नागेकर (13 वर्षे) हे जखमी झाले आहेत. नागेकर कुटुंब हे मूळचे किन्नर – कारवार येथील असून ते सध्या उपासनगर-वास्को येथे वास्तव्य करून आहे.
आतापर्यंतचा आठवा अपघात
आतापर्यंत या ठिकाणी घडलेला हा आठवा अपघात असून अपघातात सापडलेल्या आणि मडगावच्या दिशेने जाणाऱया वाहनाचा पार चेंदामेंदा झाला, तर कारवारच्या दिशेने जाणारी कार दुभाजक पार करून उलटली. या भीषण अपघाताची माहिती मिळताच सभापती रमेश तवडकर, नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणच्या दुभाजकाजवळ रम्बलर्स बसविण्याची मागणी यावेळी नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी केली.
जत्रोत्सवातून परतताना काळाचा घाला
या अपघातात ठार झालेल्या व्यक्ती या हणकोण-कारवार येथील श्री सातेरीदेवीच्या जत्रोत्सवाला जाऊन परतत होत्या अशी माहिती मिळाली असून या अपघाताची खबर मिळताच काणकोणचे पोलीस तसेच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी धावून गेले. काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, तर अग्निग्नशामक दलाच्या जवानांनी अपघातात सापडलेली वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. इतका भीषण अपघात या मार्गावर पहिल्यांदाच झालेला असून महामार्गावरील दुभाजकाचा हा परिणाम असल्याच्या प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या.
कोठंबी अपघातात युवक ठार
दरम्यान, कोठंबी-केपे येथे बुधवारी सकाळी स्कूल बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक जेसवर्ड मार्टिन्स (वय 18 वर्षे) या युवकाचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी अवेडे येथील एका शाळेची बस विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जात असताना कोठंबी येथे जाणारा रस्ता व असोल्डा येथे जाणारा रस्ता या वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने समोरून येणाऱया स्कूल बसला त्याची धडक बसली. यात दुचाकीचालकाला मृत्यू आला, अशी माहिती केपे पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत युवक चांदर येथील असून तो सक़ाळी अवेडे येथे जिमला जात होता तेव्हा हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच केपे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवचिकित्सेकरिता पाठविला. केपे पोलीस पुढील तपास करत आहेत.









