पणजी : गोवा विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अडथळा आणल्याबद्दल तसेच शिक्षकांना व विद्यार्थ्यांना धमकावल्याप्रकरणी तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करावी अशी मागणी गोवा विद्यापीठाच्या शिक्षक संघटनेने केली आहे. संघटनेनने (गुटा) काल सोमवारी विद्यापीठ परिसरात निदर्शने करून वरील मागणी केली आहे. गोवा विद्यापीठात निवडणुकीच्या नावाखाली एका विद्यार्थ्याकडून दादागिरी सुरू आहे. यापूर्वी विरोधी विद्यार्थ्याना धमकिवण्यात येत होते, परंतु आता प्राध्यापकाला देखील धमकाविण्याचा प्रकार घडला आहे. या विद्यार्थ्यापासून प्राध्यापकाच्या जीवाला धोका असून दादागिरी करणाऱ्या शिरीष परब व इतर दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठ शिक्षक संघटनेचे अधयक्ष प्रा. रामराव वाघ यांनी केली आहे.
गोवा विद्यापठाच्या निवडणुका ऑगस्टमध्ये होणार होत्या. शिरीष परब या विद्यार्थ्यान विद्यार्थी कल्याण संचालक प्रा. अँथनी व्हिएगस यांना त्यांच्या केबिनबाहेर थांबवून हातात काठी घेऊन धमकावले होते, तसेच त्यांची गाडी शिरीष याने दोन साथीदारांच्या मदतीने अडवून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्यानंतर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. याबाबत आम्हाला माहिती मिळताच कुलगुरू व कुलसिचवांना माहिती देत पोलिस तक्रार करण्याची मागणी केली होती. पोलिस तक्रार करूनही त्या विद्यार्थ्यांवर अद्याप काहीच कारवाई झालेली नाही, अशी माहिती वाघ यांनी दिली.
विद्यापीठाच्या निवडणुकी दरम्यान विद्यार्थी कल्याण संचालकांवर दबाव
आणण्याचे काम भाजप पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करत आहे. संचालकांना धमकवणारा विद्यार्थी हा अभाविपशी संबंधित आहे. तसेच त्याचे दोन साथीदारही अभाविपचे सदस्य आहेत. त्यांच्या या कृत्याचा आम्ही निषेध करतो. विद्यापीठ परिसरात अभाविपवर बंदी आणावी, अशी मागणी केल्याची माहिती एनएसयूआय गोवा प्रमुख नौशाद चौधरी यांनी दिली.
प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने रहावे : परब
आपण विद्यापीठात शिकणारा एक सामान्य विद्यार्थी असून विद्यापीठ निवडणुकीत होणारा गोंधळ आपण चव्हाट्यावर आणत होतो. त्यामुळे विद्यापीठामध्ये राजकीय पक्षाचा पदाधिकारी असणाऱ्या व्यक्तीने माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. जे प्राध्यापक विद्यापीठात राजकारण आणू नये, असे म्हणत आहेत आधी त्यांनी स्वत: राजकारणापासून दूर गेले पाहिजे. आपला कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी संबंध नाही. आपण विद्यापीठातील या लोकांकडून होणाऱ्या गैरव्यवहाराबद्दल बोलत असल्यामुळे आपल्या विरोधात राजकीय पक्षाच्या व्यक्तींकडून षडयंत्र केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणे गुन्हा नाही असे मत आहे. आपण कोणत्याही प्राध्यापकाच्या विरोधात नाही. माझी गोवा विद्यापीठातील प्राध्यापकांना विनंती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन शिशिर परब या विद्यार्थ्याने केले आहे.









