प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील सुमारे 25 हजारहून जास्त कुटुंबे टॅक्सी व्यवसायावर अवलंबून आहेत. राज्यात ओला उबर ऍप पध्दतीच्या टॅक्सी गोव्यात आणण्यास गोवा टॅक्सी मालक संघटनेने विरोध दर्शविला आहे. सरकारने घेतलेला हा चुकीचा निर्णय असून सर्वसामान्य जनतेच्या पोटावर पाय ठेवण्याचा हा प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत टॅक्सी मालक योगेश गोवेकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत रोहन खांडोळकर, चेतन कामत तसेच इतर 15 टॅक्सी मालक उपस्थित हेते.
गोव्यातील टॅक्सी मालक पर्यटकांची सतावणूक करीत असून त्यांना लुटतात असा आरोप ट्रक्सी मालकांवर केला जातो, हे कितपत खरे आहे याचा कोणी कधी विचार केला नाही. मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी मालकांची बँक खाती तपासावी त्यात किती पैसे असतात ते पहावे नंतर खरे काय ते कळेल, असेही गोवेकर यांनी सांगितले.
या पूर्वी वाहतूक खात्यातर्फे टॅक्सी मालकांना मिटर बसवणे सक्तीचे करण्यात आले होते. सरकारने सवलत देण्याचे सांगितले होते. ट्रक्सींना मिटर बसविण्यात आले मात्र काही टॅक्सी मालकांना सोडल्यास इतर टॅक्सी मालक सवलत मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. असे गोवेकर म्हणाले.
वाहतूक मंत्र्यांनी काऊंटर टॅक्सी पध्दत बंद करावी मिटर टॅक्सी पध्दतीची अमंल बजावणी करावी, अशी मागणी गोवेकर यांनी केली आहे. ऍप टॅक्सीपद्धत मोठय़ा शहरातून चालू शकते मात्र लहान शहरात आणि गावात हा प्रकार चालणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने ऍप टॅक्सी बंद कराव्यात, असेही गोवेकर यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी मालक संघटनेला विश्वासात घेऊन चर्चा करणे फार गरजेचे आहे नंतर विधानसभेत शून्य प्रहर वेळेत हा विषय मांडून त्याच्यावर चर्चा करावी अशी मागणी गोवेकर यांनी केली आहे.








