कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सध्या गोव्यात विविध उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहेत. देवस्थानचे जत्रोत्सव तसेच अन्य उत्सव मोठ्या थाटात झाले व अजूनही होत आहेत. जानेवारी 2023 उजाडताच राजधानी पणजीतील कांपालवर होणारा लोकोत्सवही मोठ्या थाटात झाला. या महोत्सवाला दरवर्षीप्रमाणे गोंयकारांबरोबरच देशी-विदेशी पर्यटकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली अन् कलेचा व प्रदर्शनाचा लाभ घेतला. हल्लीच योगगुरु रामदेवबाबा यांच्या सानिध्यात झालेल्या योग शिबिरालाही चांगलाच प्रतिसाद लाभला. एकूणच गोवा राज्य जणू उत्सवांची मांदियाळी बनली आहे. तसेच अनेक परिषदांसाठी कायमस्वरुपी केंद्र बनले आहे.
गोवा सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे नुकताच कार्निव्हल मोठ्या उत्साहात साजरा झाला. स्थानिकांबरोबरच देशी-विदेशी पर्यटकांनी यात सहभाग दर्शविला. आता गोव्यात शिमगोत्सवी धुम सुरू आहे. गेल्या सोमवारी होळीनंतर पारंपरिक शिमगोत्सवाला प्रारंभ झालेला आहे. गावागावात शबय, शबय व ढोल-ताशांच्या घुमचे कटर घुम निनादासह शिमग्याचा उत्साह संचारलेला आहे. काही भागात पाच तर काही ठिकाणी सात ते नऊ दिवस शिमगा पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. धुलीवंदन, चोरोत्सव, रोमट आदी पारंपरिक प्रकार त्या-त्या भागातील शिमगोत्सवाचे वैशिष्ट्या आहे. सरकारी पातळीवरील शिमगोत्सवाला काल 8 रोजीपासून फोंड्याहून प्रारंभ झाला आहे. आज कळंगूट येथे होणार आहे तसेच 21 माचपर्यंत विविध ठिकाणी शासकीय शिमगोत्सव साजरा होणार आहे. यंदा प्रथमच पर्वरीतही सरकारी पातळीवरील शिमगोत्सव होणार आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या भागात यापूर्वी कार्निव्हलही घडवून आणला. चित्ररथ देखावे, रोमटामेळ, लोकनृत्य, वेषभूषा अशा विविध स्पर्धांची रेलचेल शिमगोत्सवात दिसून येते.
गोमंतकीय शिमगोत्सवाला मोठी परंपरा आहे. याद्वारे गोव्याच्या संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडते. दरवर्षी गोव्यात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यामध्ये सहभागी होणारे चित्ररथ रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. बेधुंद नृत्य करणारी रोमटामेळ पथके, लक्षवेधी घोडेमोडणी नृत्य, प्रत्येक पथकांच्या पोशाखातील विविधता आदींमुळे हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जनसागर लोटतो. गोव्याची पारंपरिक वेशभूषा, विविध पौराणिक कथानकांवर आधारित चित्ररथ व हलते देखावे यामुळे गोव्याची संस्कृती व लोककलेचे दर्शन घडते. पेडणेपासून काणकोणपर्यंत शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. शिमगोत्सव म्हणजे लोकगीत, लोकसंगीत, ऐतिहासिक वारसा यांची महती सांगणारा, त्याचप्रमाणे परंपरेने जोपासलेला, लोकविश्वास, श्रद्धा यांच्या बळावर आजवर टिकून असलेल्या शिमगोत्सवाची रुपे अनंतकाळापर्यंत टिकावीत व भावी पिढीला त्याची ओळख घडावी, या हेतूने हे संचित जपणे गोमंतकीयांचे कर्तव्य आहे.
शिमगोत्सव काळात डिचोलीतील बोर्डे, पिळगाव, कुडणे, कारापूर आदी काही ठराविक भागात पारंपरिक पद्धतीने गडे उत्सव साजरा झाला. साळ गावातील गडे उत्सव प्रसिद्ध आहे. या गडे उत्सवाला नावलौकिक प्राप्त झालेला आहे. तीन दिवस हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. शिमगोत्सवात काही भागात पारंपरिक लोकनृत्य असलेल्या घोडेमोडणी प्रकारामध्ये लोककलेचे दर्शन घडते. विदेशी पर्यटकांनाही गोमंतकीय शिमगोत्सव आकर्षित करीत आहे. गोव्यात एकीकडे उत्सव मोठ्या नेटाने सुरू असताना दुसरीकडे गोवा सरकारच्या गलथान कारभाराचेही दर्शन घडत आहे. गोवा राज्यात सध्या इतर शहरांच्या तुलनेत राजधानी पणजी प्रदुषित झालेली आहे, हे खेदाने म्हणावे लागते. केंद्रीय वन-पर्यावरण मंत्रालयानेही आपल्या अहवालात सदर बाब राज्यसभेत सादर केली आहे. प्रदुषणाच्या बाबतीत देशातील 389 शहरांमध्ये पणजीचा क्रमांक 230 वा आहे. ही खऱ्या अर्थाने चिंताजनक बाब आहे. याप्रकरणी आगामी काळात तातडीने उपाययोजना आखणे गरजेचे आहे. पणजीला स्मार्ट बनविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कामांमुळे सध्या दुर्दशा झालेली आहे. अशा स्थितीत या राजधानीत शनिवार दि. 11 रोजी गोवा सरकारतर्फे शिमगोत्सव मिरवणूक होणार आहे. पणजीत स्मार्ट सिटीच्या कामामुळे रस्ता खचत असल्याने त्यात टँकर कलंडू लागले आहेत. कलंडलेले टँकर काढण्यासाठी जेसीबीचा वापर केला जात आहे. त्यामुळे यंदा पणजीत होणाऱ्या शिमगोत्सव मिरवणुकीत टँकर व जेसीबीवर आधारित चित्ररथ तयार करावेत, असा कडवट सूर व्यक्त होत आहे. आता सर्वांना चिंता आहे की, शिमगोत्सव मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या चित्ररथांना तसेच अन्य वाहनांना जेसीबीचा वापर करण्याची वेळ येऊ नये. हाती घेतलेल्या कामांमुळे सध्या वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. शिमगोत्सवातही याची प्रचिती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर उपाययोजना आतापासूनच करण्याची गरज आहे. सध्या पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात असून मनपावर रोहित मोन्सेरात आहेत. त्यांनी यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
राजधानी पणजीत सध्या सुरू असलेल्या खोदकामामुळे स्थानिकही कंटाळले आहेत. या कामातून आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत. या अनुषंगाने महानगरपालिकेने रस्त्यावर असलेले मातीचे ढीग हटविण्यास सुरू केले आहेत. तसेच जेथे मातीमुळे प्रदूषण होत आहे, तेथे पाणी शिंपडून नीट करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार दि. 11 रोजी होणारी पणजी राजधानीत होणारी शिमगोत्सव मिरवणुकही सुखकारक ठरावी, अशी अपेक्षा आहे.
राजेश परब








