क्रीडा शिक्षणात विद्यार्थ्यांनी पुढे यावे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची अपेक्षा
पणजी : विद्यार्थ्यांनी केवळ पदवीप्राप्त ज्ञानावर अवलंबून न राहता कौशल्यप्राप्त शिक्षणाकडे वळण्याची गरज आहे. भविष्यात क्रीडा विद्यापीठ, क्रीडा महाविद्यालय अशा क्रीडा विषयक शिक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. क्रीडा महाविद्यालये, विद्यापीठ राज्यात उभे रहावे, यासाठी कोणी सरकारला मदत करण्यास पुढे येत असेल तर राज्यात ती उभी केली जाईल. ते आपले स्वप्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
राज्यात प्रथमच होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या तयारीविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी क्रीडा विद्यापीठ व क्रीडा महाविद्यालयाची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेताना विविध कौशल्य वेळीच आत्मसात केल्यास त्याचा फायदा निरंतर होणार आहे. क्रीडा क्षेत्र हेही कौशल्यप्राप्त असल्याने खेळात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही नवी संधी राहणार आहे. विद्यापीठ व महाविद्यालयातून खेळाबाबतच्या पदवी, पदविका प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज असून, सुरक्षा व देखरेख याबाबतही संबंधितांना सूचना केलेल्या आहेत. वाहतूक, वैद्यकीय, अन्न व औषध प्रशासन आदी खात्यांवर स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे. टेक्निकल ऑफिसर्सही कार्यरत राहणार आहेत. क्रीड़ा स्पर्धेसाठी लागणाऱ्या सर्व साधन-सुविधा, आवश्यक गोष्टी पुरविण्यात आल्याचेही ते म्हणाले. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी पूर्णावस्थेत आहे. राज्यात प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेत सुमारे 2,100 पदके खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार मिळणार आहेत. याशिवाय स्पर्धेतील सर्वाधिक उत्कृष्ट तीन खेळांनाही अतिरिक्त तीन पदके देण्यात येणार आहेत. ही पदके निश्चित केलेल्या स्पर्धेच्या ठिकाणी दिली जातील. व्हेन्यू कमांडंट व इतर सर्व खात्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्घाटन सोहळ्यात 700 कलाकारांचे सादरीकरण
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात सुमारे 600 ते 700 कलाकार गोव्याच्या संस्कृतीविषयी कला सादर करणार आहेत. उद्घाटनसत्राचा कार्यक्रम सर्वांना पाहता यावा, यासाठी सुमारे दहा ठिकाणी तो लाईव्ह पद्धतीने दाखविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी 3500 मदतनीस तैनात
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातील मदतनीस हा महत्त्वाचा दुवा आहे. ही स्पर्धा उत्तमप्रकारे पार पडावी, यासाठी सुमारे 3 हजार 500 मदतनीस कार्य पार पाडणार आहेत. याशिवाय गोवा मानव संसाधन विकास महामंडळाचे 1 हजार रक्षक यासाठी कार्यरत ठेवण्यात आले आहेत. तसेच 1 हजार पोलिसांचीही मदत मिळणार आहे. पत्रादेवी या ठिकाणी सीमाभागावरही मदतनीस कार्यरत राहणार असून, जे क्रीडा स्पर्धक गोव्यात येतील, त्यांना त्यांच्या निश्चित स्थळी म्हणजे हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत हे मदतनीस काम पाहणार असल्याचे मंत्री गावडे यांनी सांगितले.









