केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री राणे यांचे आवाहन : गोव्यात लवकरच ‘एमएसएमई’च्या कार्यालयाचीही घोषणा
प्रतिनिधी /पणजी
गोवा राज्य हे पूर्णपणे पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. याला कारणेही विविध आहेत. गोव्यातील जनता ही कष्टकरी आहे. त्यामुळे या ठिकाणी लघु उद्योगात पाठिमागे न राहता गोव्याने उत्पादित राज्य बनावे, यासाठी भर द्यायला हवा. केंद्रातर्फे गोव्याला सर्व मदत करण्यात येणार असून, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे गोव्यात स्वतंत्र कार्यालय स्थापन करून देऊ, अशी घोषणा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.
दोनापावला येथील राजभवनच्या सभागृहात काल शुक्रवारी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे आयोजित केलेल्या एकदिवसीय अधिवेशनात नारायण राणे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, एसएमई ऍण्ड स्टार्टअपचे अध्यक्ष अजय ठाकूर, सचिव रवी सोनावणे, उद्योजक विजय दुबे, अमित कुमार, नितीन कुंकळ्येकर, राजकुमार कामत आदी उपस्थित होते.
गोव्यातील 96 टक्के उद्यागे सूक्ष्म
केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, गोव्यात सुरू करण्यात येणाऱया सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग कार्यालयात योजना, तंत्रज्ञान, व्यवसाय यासंबंधीची सर्व माहिती गोवासीयांना करून दिली जाईल. गोव्यातील 96 टक्के उद्योग हे सूक्ष्म श्रेणीतील आहेत. या क्षेत्रामध्ये वाढीची प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे सर्व सूक्ष्म उद्योगांना लघु श्रेणीत वाढ करण्याचे आणि सर्व लघु उद्योगांनी मध्यम श्रेणीत वाढ करण्यासाठी स्वतः झोकून द्यायला हवे. कारण लघु उद्योगांची निर्मिती झाल्यास राज्याचा विकासदर हा प्रगतीपथावर येईल.
कार्यालय सुरु झाल्यास गोव्याचा लाभ
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, केंद्रीय मंत्री राणे यांनी राज्यात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्याचे सांगितल्याने गोव्यात उद्योगवाढीला भरपूर वाव मिळणार आहे. गोव्यातील एमएसएमई क्षेत्राच्या प्रतिनिधींना केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या सर्व योजना आणि प्रोत्साहनांचा वापर करून त्यांचे व्यवसाय आणि गोव्याची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले. उद्योग सुरू करण्यात कोणत्या अडचणी येत असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधा, आपण उद्योगाच्याआड येणाऱया अडचणी सोडविल्याशिवाय राहणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यातील लहान उद्योजकांना दिले.
तीन उद्योजकांचा सन्मान
या कार्यक्रमात लहान लहान उद्योगातून गोव्याचे नाव मोठे करण्यात व स्वतः यशस्वी उद्योजक ठरलेल्या शेखर सरदेसाई, पल्लवी साळगावकर व दामोदर कोचकर यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
या एकदिवसीय अधिवेशनात सुमारे 600 उद्योजकांनी भाग घेतला. या अधिवेशनात उद्योजक राजकुमार कामत, अजय ठाकूर, अमित कुमार, नितीन कुंकळ्येकर, विजय दुबे आदींनीही विविष विषयावर आपले मत मांडून राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
कोविड काळात केंद्रीय मंत्रालयाला 5 कोटीचा निधी
मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यातील इतर उद्योजकांचे कौतुक करताना सांगितले की, गोवा काही गोष्टीत मागे असला तरी कोविडसारख्या कठीण काळात राज्याने एमएसएमई मंत्रालयाला 5 लाख कोटी रुपयांचा निधी दिला आहे. गोवा राज्य इतर गोष्टीत शेजारील राज्यावर अवलंबून असले तरी औषध निर्मिती आणि खनिज या गोष्टीत गोवा पुढे असून, या उद्योगांमुळे येथील उत्पादित माल शेजारील राज्याला किंबहुना देशाला पुरवला जात असल्याचेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
खाणीवर, पर्यटनावर अवलंबून राहू नका
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याचे दरडोई उत्पन्न 4.5 लाख रुपये असले तरी येथील नागरिकांनी विकसित राष्ट्रांनी प्राप्त केलेल्या पातळीशी बरोबरी करण्याचा विचार केला पाहिजे. गोवा राज्य हे अजूनही काही गोष्टीत शेजारील राज्यांवर अवलंबून आहे, हे नाकारता येत नाही. कारण या ठिकाणी पर्यटन व्यवसाय मोठा असला तरी यासाठी लागणारा भाजीपाला, मटन, चिकन, दूध आदींसाठी शेजारील राज्यांचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन गोमंतकीयांनी लघु उद्योगाकडे वळावे. बेरोजगारी कमी होऊन गोमंतकीयांच्याही हाताला काम मिळेल. म्हणून गोमंतकीयांनी केवळ खाणकाम आणि पर्यटनावर अवलंबून न राहता लघु उद्योगांना महत्त्व द्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले.









