राज्यात विविध ठिकाणी मिळून 44 क्रीडा प्रकार : देशातील आठ हजार क्रीडापटू झुंजणार पदकांसाठी
मडगाव, फोंडा : देशात सर्वांत महत्त्वाचा क्रीडा खेळ असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी गोवा सज्ज झाला आहे. गोव्यात या स्पर्धेचे आयोजन 25 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. गोव्यात प्रथमच होणाऱ्या या खेळाच्या सफल आयोजनासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून याचा सविस्तर कार्यक्रम आज शुक्रवारी क्रीडामंत्री गोविंद गावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत जाहीर करणार आहेत. यावेळी राज्याच्या क्रीडा सचिव आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वेतिका सचन यांचीही उपस्थिती असेल. क्रीडा खाते तसेच गोवा क्रीडा प्राधिकरण या स्पर्धेच्या सफल आयोजनासाठी रात्रंदिवस झटत आहेत. एकूण 8000 अॅथलेट्स तसेच अधिकाऱ्यांचा या स्पर्धेत सहभाग राहणार असून क्रीडापटू विविध खेळांतील प्रभुत्वासाठी झुंज देणार आहे. येत्या काही दिवसात राज्यातील स्टेडियम्स तसेच इनडोअर्स खेळाडू आणि प्रेक्षकांनी गजबजलेले दिसणार आहेत.
तब्बल 44 क्रीडा प्रकारांचा समावेश
एकूण 44 क्रीडाप्रकारात या स्पर्धेचे आयोजन कांपाल मल्टिपर्पझ इनडोअर स्टेडियम, कांपाल खुले मैदान, बांदोडकर कांपाल मैदान, हवाई बीच दोनापावला, मिरामार बीच, डॉ. शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम, बांबोळी अॅथलेटिक स्टेडियम, पेडे इनडोअर, पेडे क्रीडा संकुल, शापोरा नदी, फातोर्डा स्टेडियम, कोलवा बीच, वेर्णा-बिर्ला बायपास रोड, फोंडा क्रीडा संकुल, अभियांत्रिकी कॉलेज फर्मागुडी, चिखली, टिळक मैदान येथे होतील. गोल्फ खेळ नवी दिल्लीत जेपी ग्रीन गोल्फ कोर्सवर, सायकलिंग ट्रॅक रेसचे आयोजन नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार आहे.
निवास, वाहतूक व्यवस्थेची सज्जता
स्पर्धेचे उद्घाटन फातोर्डा स्टेडियमवर 26 ऑक्टोबर रोजी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची उद्घाटन सोहळ्याला खास उपस्थिती असेल. स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन जरी 26 रोजी होणार असले तरी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील काही खेळांना 18 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या अॅथलेट्स आणि अधिकाऱ्यांची राहण्याची व्यवस्था शासन करणार असून अॅथलेट्स स्पर्धेस्थानी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्पर्धेतील सामने होणाऱ्या प्रत्येक मैदानावर व्यवस्थापक, समन्वयक तसेच अधिकाऱ्यांची नेमणूकही क्रीडा खात्याने केली आहे.
काही संघटनांचा वाईट हेतू
राज्यातील काही क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी गुप्तपणे सध्या राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला विरोध करताना दिसत आहेत. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सर्व क्रीडा संघटनांना मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले अनुदान दिल्यानंतर त्यांचे तेवढेच काम आता फत्ते झाल्याचे दिसून येत आहे.
संघटनांना अनुदान देऊनही अनास्था
सुमारे 25-25 लाखांचे अनुदान या क्रीडा संघटनांना देण्यात आले आहे. आता अनुदान मिळाल्यानंतर या क्रीडा संघटनांना राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत काहीच पडून गेलेले नसल्याचे दिसून येत आहेत. आमचे काम झाले आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आम्हाला पडून गेलेले नाही, असे काही क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उघडपणे बोलत आहेत.
ऑलिंपिक संघटनेला अलिप्त ठेवल्याने अपप्रचार
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी देशातील सर्व राज्य ऑलिंपिक संघटनांना अलिप्त ठेवण्यात आले आहे. गोव्यातही हा प्रकार सुरू आहे. गोवा ऑलिंपिक संघटनेतीलच काही विघ्नसंतोषी मंडळी या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत अप्रचार करत असल्याचे क्रीडा खात्यातील एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले. गोव्यातच नव्हे तर इतर राज्यांतीलही राज्य ऑलिंपिक संघटनांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपासून अलिप्त ठेवण्यात आले असून यासाठीच त्यांचा इतर राज्यातूनही गोव्यातील स्पर्धेबाबत अप्रचार सुरू आहे. असे असले तरी गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा निश्चितच सफल होणार असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला.
अनेक ठिकाणची क्रीडासंकुले झाली सज्ज
गोव्यात 25 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक साधनसुविधाही जवळजवळ पूर्ण झाल्या आहेत. पेडे येथील मल्टिपर्पझ स्टेडियम, बांबोळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, कांपाल जलतरण संकुल, नावेली तसेच फोंडा क्रीडा संकुल स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे.
गोव्याच्या संघांचाही सराव नेटाने
स्पर्धेत सहभागी होणारे गोव्याचे संघही सराव करताना दिसत आहेत. आतापर्यंत गोव्याने कित्येक राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन यशस्वीपणे केले आहे. गोव्याला राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन हे काही नवीन नाही. आता मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यासाठी अनेकांचे सहाय्य जरूरी आहे. काल गुरुवारी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणाऱ्या क्रीडा स्थानांची पाहणी केली. आता 7 ऑक्टोबर रोजी क्रीडामंत्री राज्य क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची स्थाने व क्रीडाप्रकार:
- अॅथलेटिक स्टेडियम बांबोळी – रग्बी व अॅथलेटिक्स
- शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम – बॅडमिंटन, फॅन्सिंग व व्हॉलीबॉल
- हवाई बीच दोनापावल – रॉविंग, यॉटिंग
- करंजाळे मिरामार रोड – ट्रायथ्लॉन
- मिरामार बीच – बीच हँडबॉल, बीच व्हॉलीबॉल, मिनी गोल्फ
- कांपाल मल्टिपर्पझ स्टेडियम – नेटबॉल, टेबलटेनिस, कब•ाr
- जलतरण संकुल कांपाल – जलतरण
- कांपाल स्पोर्ट्स विलेज – वेटलिफ्टिंग, वुशू ज्युडो, पँचाक सिलात, गटका व योगासन, मल्लखांब, कुस्ती व लगोरी.
- शापोरा नदी – रोंविंग, कॅनोईंग व कायाकिंग
- पेडे इनडोअर स्टेडियम – जिम्नॅस्टिक्स व बॉक्सिंग
- बॅडमिंटन हॉल पेडे – बिलियर्ड्स व स्नूकर
- पेडे हॉकी मैदान – हॉकी
- मांद्रे शुटिंग रेंज – शूटिंग
- फोंडा क्रीडा संकुल – मॉडर्न पँटाथ्लॉन, तायक्वांदो, खो-खो
- अभियांत्रिकी कॉलेज – तिरंदाजी
- फातोर्डा स्टेडियम- फुटबॉल पुरूष
- फातोर्डा सराव मैदान – लॉन टेनिस
- फातोर्डा मल्टिपर्पझ हॉल – सॅपेकटॅकरो, स्क्वे मार्शल आर्ट्स
- मनोहर पर्रीकर स्टेडियम नावेली – बास्केटबॉल, रोलबॉल व हँडबॉल
- कोलवा बीच – बीच व्हॉलीबॉल
- वेर्णा बिर्ला बायपास एअरपोर्ट रोड – सायकलिंग
- चिखली क्रीडा संकुल – लॉन बोल्स, स्क्वॉश फॅसिलिटी
- टिळक मैदान वास्को – फुटबॉल महिला









