दर्जेदार उच्च शिक्षणात देशात गोवा आघाडीवर : उच्च शिक्षण संचालनालयाची प्रशंसनीय कामगिरी
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे बहुमूल्य मार्गदर्शन, कार्यतत्परता आणि शिक्षणाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन यामुळे उच्च शिक्षणाच्या गुणात्मक विकासात गोवा गेल्या काही वर्षांपासून लक्षणीय प्रगती करत आहे. याशिवाय शिक्षण सचिव प्रसाद व्ही. लोलयेकर (आयएएस) यांच्या गतिमान नेतृत्वाखाली उच्च शिक्षण संचालनालयाने केलेल्या दर्जेदार कामगिरीमुळे उच्च शिक्षणात गोवा राज्य देशात आघाडीवर आहे. उच्च शिक्षण संचालनालयाने नॅकच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यशाळा, परिषदा, परिसंवाद, प्रशिक्षण याचेही हे फलित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने उच्च शिक्षणामध्ये समानता, गुणवत्ता आणि क्षमता विकसित करण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालय अथक प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या आदेशानुसार, डिसेंबर 2024 पर्यंत सर्व पात्र महाविद्यालयांची 100 टक्के मान्यता आणि मूल्यांकन साध्य करण्याचे उच्च शिक्षण संचालनालयाचे उद्दिष्ट आहे.
नॅक मानांकनाच्या टक्केवारीत गोवा प्रथम
नॅक प्रक्रियेतून गेलेल्या महाविद्यालयांच्या टक्केवारीनुसार देशात गोवा प्रथम क्रमांकावर आहे. सध्या, उच्च शिक्षण संचालनालय राज्यातील 39 महाविद्यालयांची देखरेख करते, त्यापैकी प्रभावी 25 महाविद्यालयांना नॅकद्वारे मान्यता देण्यात आली आहे. तर 5 महाविद्यालये मान्यतेसाठी अपात्र आहेत. म्हणजे 34 पैकी 25 महाविद्यालयांनी नॅक मानांकन प्राप्त केलेले आहे.
नॅकमध्ये गोव्याचा अनोखा आदर्श
गोव्यातील एकूण 74 टक्के महाविद्यालयांनी नॅकद्वारे मान्यता प्राप्त करून उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित केले आहे. तर महाराष्ट्र, संस्थांच्या संख्येच्या बाबतीत आघाडीचे राज्य असूनही, त्यांच्या केवळ 35 टक्के संस्थांनाच मान्यता आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीने गोव्याने अनोखा आदर्श निर्माण केलेला आहे.
गोव्याची नॅकमधील लक्षणीय प्रगती
गोव्यातील 12 टक्के महाविद्यालयांना प्रतिष्ठित ए प्लस दर्जा देण्यात आला आहे. 52 टक्के महाविद्यालयांनी ए श्रेणी मिळवली आहे. 36 टक्के महाविद्यालयांनी बी ते बी प्लस प्लस मधील श्रेणी प्राप्त केल्या आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांमुळे काही महाविद्यालये नॅक प्रक्रिया पूर्ण करू शकली नाहीत.
शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांचे गतिमान नेतृत्व
- शिक्षण सचिव प्रसाद व्ही. लोलयेकर यांच्या गतिमान कार्यशीलतेमुळे व नेतृत्वामुळे नॅक मानांकनात राज्यातील महाविद्यालयांनी कमालीची प्रगती केलेली आहे.
- नॅक (नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रेडिटेशन कौन्सिल) मान्यता आणि मूल्यांकन प्रयत्नांमध्ये महाविद्यालयांना सक्रियपणे पाठिंबा देऊन कार्यप्रणालीत अमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.
- उच्च शिक्षणातील गुणवत्ता सुनिश्चित करून अर्थपूर्ण दिशा प्रदान करण्यात लोलयेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. परिणामी, गोवा उच्च शिक्षणात देशात आघाडीवर आहे.









