केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा ‘युडीआयएसई प्लस’ अहवाल सादर
प्रतिनिधी/ पणजी
गोवा हे राज्य देशाच्या नकाशात टिंबा एवढे असले तरी वाचनसंस्कृतीत आघाडीवर आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लसने जाहीर केलेल्या अहवालानुसार देशातील सर्व राज्यांमध्ये गोव्यातील शाळांमध्ये सर्वाधिक पुस्तके आहेत. त्यामुळे देशात गोवा हे शाळांमधील वाचनालयात सर्वाधिक पुस्तके असणारे प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे.2022-2023 या सालामध्ये राज्यातल्या विविध शाळांच्या वाचनालयात आणि पुस्तक बँकामध्ये 39 लाख 46 हजार 645 इतकी पुस्तके होती. 2024-2025 या वर्षामध्ये हा आकडा वाढून एकूण 44 लाख 25 हजार 194 पुस्तके असल्याची अहवालात नोंद आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील विविध शाळांनी मिळून एकूण 2.38 लाख पुस्तके विकत घेतली आहेत. याचा अर्थ दरवर्षी सरासरी 1.19 लाख पुस्तके शाळेच्या वाचनालयात उपलब्ध झाली आहेत.
प्रत्येक शाळेत 3 हजार पुस्तके
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लसच्या अहवालाप्रमाणे 2024-2025 ह्या वर्षी गोवा राज्यात एकूण 1479 शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये वाचनालय वा पुस्तक बँकेची सुविधा आहे. एकूण पुस्तकांचा आकडा विचारात घेतल्यास प्रत्येक शाळेत सरासरी 2 हजार 992 पुस्तके उपलब्ध आहेत.
केरळ दुसरे, हरियाणा तिसरे राज्य
सरासरी पुस्तके अधिक असलेल्या राज्यांच्या क्रमवारीत गोव्याचा देशात पहिला क्रमांक आहे. या यादीत केरळ राज्य दुसऱ्या स्थानी आहे. केरळमधील शाळांमध्ये सरासरी 2,836 पुस्तके आहेत. त्या पाठोपाठ हरियाणा राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. हरिणातील शाळांमध्ये 2242 पुस्तके आहेत. चौथ्या स्थानी कर्नाटक राज्य असून, कर्नाटकातील शाळांमध्ये सरासरी 1636 पुस्तके आहेत.
देशातील सर्व शाळांमध्ये मिळून एकूण 121 कोटीहून अधिक पुस्तके आहेत. देशभरातील प्रत्येक शाळेमध्ये सरासरी 827 पुस्तके उपलब्ध आहेत. केंद्रीय प्रदेशातील शाळांमध्ये चंदीगढ पुढे आहे. या ठिकाणच्या शाळेत सरासरी 9990 पुस्तके आहेत. त्यानंतर दिल्लीत 5932, तर पुद्दुचेरीत 3348 पुस्तके आहेत.
गोव्यात 41 शाळांमध्ये डिजिटल ग्रंथालय
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लसने जाहीर केलेल्या अहवालानुसार गोवा राज्यातल्या 1479 शाळांपैकी केवळ 41 शाळांमध्येच डिजिटल वाचनालय आहेत. यामध्ये सरकारी शाळांमध्ये (10), अनुदानित शाळांमध्ये (23) आणि खासगी शाळांमध्ये (8) डिजिटल वाचनालय असल्याची नोंद आहे.
‘युडीआयएसइ प्लस’चे कार्य
युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस ही भारतातील एक अद्ययावत ऑनलाइन शैक्षणिक व्यवस्थापन माहिती प्रणाली आहे. जी पूर्व-प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंत सर्व मान्यताप्राप्त आणि अमान्य शाळांमधील डेटा गोळा करते आणि प्रमाणित करते. शिक्षण मंत्रालयाने विकसित केलेले हे शालेय पायाभूत सुविधा, विद्यार्थी आणि शिक्षकांवरील तपशीलवार, रिअल-टाइम डेटासाठी एक व्यापक व्यासपीठ म्हणून काम करते, ज्यामुळे भारताच्या शिक्षण प्रणालीसाठी पुराव्यावर आधारित नियोजन आणि धोरण तयार करणे शक्य होते.









