प्रभारी मणिकम टागोर यांनी घेतला आढावा
पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत असून गोव्याचे प्रभारी आणि निरीक्षक माणिकम टागोर यांच्या उपस्थितीत काल शुक्रवारी एकंदरीत राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. टागोर हे सध्या गोवा दौऱ्यावर असून काँग्रेस आमदार, नेते तसेच प्रमुख कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान राज्यसभा निवडणूक लढवण्याचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्टींवर सोपवण्यात आला आहे. टागोर यांनी काँग्रेस पक्षाच्या विविध बैठकांचे सत्र चालवले असून लोकसभा निवडणूक गंभीरतेने घेण्याची सूचना संबंधितांना केली आहे. गोव्यात लोकसभेच्या दोन जागा असून त्या जिंकण्यासाठी उमेदवार ठरवण्यापासून एकंदरीत रणनितीवर चर्चा करण्यात आली. विरोधी पक्षांतर्फे एकमेव उमेदवार देण्यात यावा असे काँग्रेसचे सर्वसाधारण मत असल्याचे सुत्रांनी सांगितले. गोवा प्रदेश काँग्रेस कार्यकारी समिती-जिल्हा समिती यांचीही एकत्र बैठक घेण्यात आली. काही संघटनात्मक विषयावर विचारविनिमय झाला. अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाचे काही नेते, पदाधिकारी डावलतात अशी तक्रार टागोरांकडे केली. काही काँग्रेस गटांची पुनर्रचना करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात गटाध्यक्षांची स्वतंत्र बैठक घेण्याचे ठवण्यात आले. गोव्यातील 24 जुलैची राज्यसभा निवडणूक लढवावी अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समिती, इतरांनी टागोरांकडे केली. त्यावेळी अंतिम निर्णय पक्षक्षेष्ठींनी घ्यावा असे सूचित करण्यात आले.








