गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माहिती : ‘कॅश फॉर जॉब’वर लढा सुरुच ठेवणार
पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीची डिसेंबर अखेरपर्यंत पुनर्रचना करण्यात येणार असून दोन्ही जिल्हा समित्या तसेच गट काँग्रेस समित्यादेखील जानेवारी 2025 पर्यंत बदलण्यात येणार आहेत. डिसेंबर 2025 मध्ये होणारी जिल्हा पंचायत निवडणूक आणि 2027 मधील विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिली आहे. गोवा प्रदेश कार्यकारी समितीची बैठक ठाकरे यांनी काल गुरुवारी घेऊन पक्षांची संघटनात्मक बांधणी तसेच इतर गोष्टींवर चर्चा केली. गोव्यात सध्या ‘कॅश फॉर जॉब’ हा घोटाळा म्हणजे ज्वलंत विषय बनला असून त्या विरोधात लढण्याचे काम पक्ष चालूच ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले.
युती करण्याचा किंवा ती सोडण्याचा हा विषय स्थानिक पातळीवर होत नाही तर तो पक्षश्रेष्ठी उच्च पातळीवर चर्चा करुन निर्णय घेतला जातो, असा खुलासा ठाकरे यांनी केला. ‘आप’ किंवा इतर विरोधी पक्षांसोबत युती करावी की नाही हे पक्षश्रेष्ठी ठरवत असून त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवला जातो. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊन तो अंमलात येतो, असे ठाकरे यांनी नमूद केले. आप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात सध्यातरी कोणताही वाद नाही, असेही ते म्हणाले. ‘कॅश फॉर जॉब’ या गोव्यातील महाघोटाळ्dयावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने काँग्रेस आमदाराचा बोगस व्हिडिओचा आधार घेतल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी पोलिसात तक्रारही नोंदवली असून त्याचा तपास प्रथम होऊ दे मग खरे – खोटे काय ते समोर येईल, असे ठाकरे म्हणाले. आमदार कार्लोस फेरेरा हे बैठकीत हजर होते आणि त्यांनी चर्चेत भाग घेतला अशी माहिती ठाकरे यांनी दिली. दरम्यान, फेरेरा यांनी त्या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शविल्याचे समोर आले आहे.









