देशभरातील 1881 पैकी 977 प्रकरणे गोव्यात ; केवळ 100 कि.मी. किनारपट्टीत मोठी बांधकमे
पणजी ; किनारी नियंत्रण विभागाचे (सीआरझेड) नियम मोडणारी एकूण 977 प्रकरणे गोवा राज्यात नोंद झाली असून संपूर्ण देशात गोवा राज्य ‘टॉप’ ठरले आहे. केवळ 100 किमीच्या आसपास किनारपट्टी लाभलेल्या गोवा राज्यात देशातील सर्वाधिक सीआरझेड उल्लंघन प्रकरणे नोंदविण्यात आली असून देशातील एकूण प्रकरणांच्या तुलनेत गोव्यात अर्धी म्हणजे 50 टक्के प्रकरणे असल्याचे समोर आले आहे. देशाची एकूण किनारपट्टी 7516 किमी असून सीआरझेड उल्लंघनाची एकूण 1881 प्रकरणे देशात नोंद झाली आहेत. त्यातील अर्धी व सर्वाधिक प्रकरणे 977 गोव्यात आहेत.
बेकायदा बांधकामांवर कारवाई नाही
देशाच्या किनारपट्टीवरील सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश यांचा किनारी भागाचे प्रमाण आणि सीआरझेड उल्लंघनाची प्रकरणे यांची तुलना केल्यास गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात किनारी भागात बेकायदा बांधकामे झाल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर त्या उल्लंघनांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील किनारी व्यवस्थापन प्राधिकरणाकडे नोंद झालेल्या आकडेवारीचा संदर्भ घेऊन गोव्यात सर्वाधिक सीआरझेड उल्लंघन प्रकरणाची नोंद झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. गोवा राज्य आकाराने लहान असला तरी सीआरझेड उल्लंघनात इतर मोठ्या राज्यांच्या तुलनेत आघाडीवर नव्हे तर चक्क शिखरावर असल्याचे सदर आकडेवारीतून समोर आले आहे.
राजकीय दबावामुळे कारवाई नाही
या सीआरझेड उल्लंघनाच्या तक्रारी गोवा राज्य किनारी व्यवस्थापन प्राधिकरणाकडे केल्या जातात, परंतु त्यांची हवी तेवढी गांभिर्याने दखल घेतली जात नाही. राजकारणी, मंत्री यांच्या दबावापुढे ती प्रकरणे तशीच प्रलंबित ठेवून कारवाई केली जात नसल्याचे सत्य यातून उघड झाले आहे. गुजरात राज्याची किनारपट्टी सर्वाधिक मोठी 1214 किमी आहे परंतु तेथे सीआरझेड उल्लंघनाची प्रकरणे फक्त 39 आहेत. आंध्रप्रदेशची किनारपट्टी 973 किमी तर अंदमान निकोबारची किनारपट्टी 1967 किमी एवढी तर लक्षद्विपची 132 किमी असून देखील तेथे सीआरझेडचे प्रकरण एकही नाही. दोन्ही केंद्रशासित प्रदेश आहेत. कर्नाटकची किनारपट्टी 280 कि.मी. आहे तर तेथे 101 प्रकरणे सीआरझेड उल्लंघनाची नोंदवण्यात आली आहेत. पुडूचेरीची किनारपट्टी 42 किमी असून तेथे फक्त 7 प्रकरणे आहेत. महाराष्ट्रात सीआरझेड उल्लंघनाची 556 प्रकरणे आहेत. तामिळनाडूची किनारपट्टी 652 किमी आहे. तामिळनाडूची किनारपट्टी 906 किमी असून तेथे 84 प्रकरणे नोंद आहेत. केरळची किनारपट्टी 569 असून तेथे 45 प्रकरणे नोंद करण्यात आली आहेत. ओडिशाची किनारपट्टी 476 किमी लांब असून तेथे 43 प्रकरणे घडली आहेत तर पं. बंगालच्या 156 किमी किनारपट्टीवर 28 सीआरझेड उल्लंघनाची प्रकरणे नोंद झाली आहेत. दमण-दिवच्या 42 किमी किनारपट्टीवर फक्त 1 प्रकरण नोंदवण्यात आले आहे.









