शिरोडय़ातील गरीब कल्याण संमेलनात मुख्यमंत्र्यांची घोषणा
प्रतिनिधी /शिरोडा
केंद्रातील मोदी सरकारने देशातील प्रत्येक घटकाच्या उत्कर्षासाठी विविध योजना राबवून खऱया अर्थाने गरीबांना विकासाच्या प्रवाहात आणले. प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज, पाणी, शौचालय व गॅस सिलिंडर या प्राथमिक सुविधा पोचविल्या. मोदी सरकारने दिलेल्या आत्मनिर्भर भारतच्या पावलावर पाऊल ठेऊन गोव्यातील भाजपा सरकारने स्वयंपूर्ण गोवाचा नारा दिला. पहिल्या टप्प्यातील यशानंतर आता स्वयंपूर्ण गोवा पर्व 2 सुरु केल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याने शिरोडा मतदार संघात आयोजित केलेल्या गरीब कल्याण संमेलनात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. बाजार शिरोडा येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला शिरोडय़ाचे आमदार तथा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, गोवा प्रदेश भाजपाचे सरचिटणिस दामू नाईक, ऍड. नरेंद्र सावईकर, बोरी जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर, शिरोडय़ाचे जि. पं. सदस्य नारायण कामत, शिरोडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष सूरज नाईक, सरचिटणिस अवधूत नाईक, शिरोडाचे सरपंच अमित शिरोडकर, पंचवाडीचे सरपंच अमिर नाईक, बेतोडाचे सरपंच विशांत गावकर, परिमल सावंत तसेच अन्य पंचसदस्य व भाजपाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
देशात मोठय़ाप्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या स्टार्टअप योजनेवर गोवा सरकार भर देणार आहे. या योजनेतंर्गत रोजगार कौशल्य प्रशिक्षण तसेच रु. 10 लाखापर्यंत व्यावसायिक सवलत मिळणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे तर गोवा मुक्तीला 60 वर्षे पूर्ण झाल्याने आत्मनिर्भर प्रमाणेच गोवा स्वयंपूर्ण बनविण्याचे सरकारचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
सेवा, सुशान व गरीब कल्याण हा भाजप सरकारचा नारा : शिरोडकर
मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, केंद्रातील भाजपा सरकारची प्रत्येक योजना सामान्य कुटुंबाचा उत्कर्ष साधणारी आहे. सेवा, सुशासन व गरीब कल्याण हा नारा घेऊनच सरकार पुढे जात आहे. मोदी सरकारने गरीबांच्या कल्याणासाठी देशभरात 174 योजना कार्यान्वित केल्याचे ऍड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. मोदी सरकार सत्तेवर आल्यानेच देशात खरा बदल घडला, असे दामू नाईक म्हणाले. जनधनसारख्या योजनांचे पैसे आज थेट लाभधारकांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. यापूर्वी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात ते मधोमध गायब व्हायचे अशी टिकाही त्यांनी केले. विशांत गावकर, क्रिस्तेंव डिकॉस्ता, अवधूत नाईक, परिमल सामंत, अमित शिरोडकर यांची यावेळी भाषणे झाली. स्वागत सूरज नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी शिरोडकर यांनी तर शिवानंद नाईक यांनी आभार मानले.









