उद्घाटनासाठी मडगाव रेल्वेस्थानक सज्ज
मडगाव : ‘वंदे भारत एक्सप्रेस’ रेल्वे आज मंगळवार दि. 27 जूनपासून कोकण रेल्वेच्या गोवा-मुंबई मार्गावर धावणार आहे. मडगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारतचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते आभासी पद्धतीने होणार आहे. ओडिशा येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे वंदे भारतचे उद्घाटन लांबणीवर पडले होते. आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळ येथील राणी कमलापती स्टेशनवर सकाळी 9.45 वाजता दाखल होतील. या ठिकाणी ते राणी कमलापती-इंदोर वंदे भारत ट्रेनची पाहणी करणार असून लहान मुले तसेच वंदे भारतच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते सर्वप्रथम गोवा-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला आभासी पद्धतीने झेंडा दाखवतील. लोकार्पणासाठी ‘वंदे भारत’ मडगाव स्थानकावर दाखल झाली आहे. ही टेन आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. मान्सूनमुळे कोकण रेल्वे मार्गावर वेग मर्यादा लागू करण्यात आल्याने टेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.









