हाताच्या ‘टच’ने उघडणार दरवाजे ‘विस्टा डोम सीट‘सह आठ बोगी एलईडी लाईट्सचे प्रसन्न वातावरण गोव्याहून आठ तासांत गाठणार मुंबई
प्रतिनिधी / मडगाव
गोवा-मुंबई दरम्यान धावणार असलेली बहुचर्चित ‘वंदे भारत’ ट्रेनची अनेक वैशिष्ठ्यो प्रवाशांना भुरळ घालणारीच आहेत. त्यामध्ये सर्वकाही अत्याधुनिक, सौंदर्यपूर्ण सुविधा उपलब्ध आहेत. सेन्सरचे दरवाजे, एलईडी लाईट्स, 360 अंशात फिरणारी सीट तसेच अतिशय स्वच्छ आणि आधुनिक स्वच्छतागृह असून, त्याचा दरवाजा देखील हाताच्या ‘टच’ ने उघडतो, अशा साऱ्या खास वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे वंदे भारत! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यासाठी वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता गोवा-मुंबई ही वंदे भारत रेल्वे मंगळवार दि. 27 जूनपासून सुरू होत आहे.
अत्याधुनिक नेत्रसुखद इंटेरिअर
गोवा-मुंबई वंदे भारत टेनचे इंटेरिअर नेत्रसुखद आहे. ही टेन 120 कि.मी. प्रतितास वेगाने धावत 586 कि.मी.चे अंतर आठ तासांत पूर्ण करेल. वंदे भारत टेन या प्रवासात 11 स्थानकांवर थांबे घेईल. टेनमध्ये 2 बाय 2 सीट अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक सीटजवळ मोबाईल फोन चार्जिंगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
‘विस्टा डोम सीट’सह आठ बोगी
या टेनला आठ बोगी असून यात 360 अंशात फिरणाऱ्या विस्टा डोम सीटचा देखील समावेश आहे. टेनमध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत. अतिशय स्वच्छ आणि आधुनिक स्वच्छतागृह असून, त्याचा दरवाजा देखील हाताच्या सेन्सरने उघडतो. टेनमध्ये एलईडी लाईट्सची सुविधा असून, त्यामुळे आतील वातावरण प्रसन्न राहत आहे. पीठमपूर-मध्यप्रदेशातील पिनॅकल इंडस्ट्रीजने वंदे भारत ट्रेनसाठी आसने तयार केली आहेत. पिनॅकल इंडस्ट्रीज ही भारतातील एकमेव इंटिग्रेटेड कमर्शियल व्हेईकल सीटिंग आणि इंटेरियर तयार करणारी कंपनी आहे.
प्रधानमंत्री करणार व्हर्च्युअल उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार दि. 27 जून रोजी एकाच वेळी गोवा-मुंबई या वंदे भारतसह पाच वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. हा उद्घाटन सोहळा आभासी पद्धतीने होणार आहे. गोवा-मुंबई सेमी-हायस्पीड वंदे भारत टेनचे 3 जून रोजी नियोजित उद्घाटन ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे पुढे ढकलण्यात आले होते, ते आता 27 जून रोजी मडगाव स्थानकावर होणार आहे.









